सोने गाठणार 40 हजारांचा टप्पा!

236

हिंदुस्थानात सोन्याच्या भावाने आतापर्यंतचे सारे रेकॉर्ड मोडले आहेत. सराफा बाजारात सोन्याच्या दराने सोमवारी 39 हजारांचा पल्ला गाठला होता. आता त्यापुढे जाऊन सप्टेंबर महिन्यात सोने 40 हजारांवर पोहचणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिवाळीपर्यंत ही दरवाढ कायम राहील.

हिंदुस्थानमध्ये सोन्याच्या भावाने जवळपास 38,470चा आकडा गाठला असून लवकरच सोन्याचा दर प्रति तोळा (दहा ग्रॅम) 40 हजारांवर पोहचणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. श्रावणात सण-वार सुरू झाल्यानं दागिन्यांची मागणी वाढेल, त्यामुळं सोन्याच्या दरातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे.

‘ऑल इंडिया सराफा असोसिएशन’ने दिलेल्या माहितीनुसार सोन्याच्या कालच्या भावात 50 रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने प्रति दहा ग्रॅमचा भाव 38,470 रुपयांवर पोहोचला. न्यूयॉर्क येथील बाजारपेठेत सोमवारी सोन्याचा प्रति औंस भाव 1503.30 डॉलरवर गेला. सणासुदीच्या दिवसात 10 ग्रॅमसाठी 40 हजार रुपयांपर्यंत सोन्याचा भाव पोचण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्यात गुंतवणूक करण्याकडे भर दिला जात आहे.

– मागील एका महिन्यात सोन्याच्या भावात 9 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
– गेल्या आठवडय़ात सोन्याच्या किमतीत प्रति तोळ्यामागे 1750 रुपये इतकी वाढ नोंदवली गेली. एका आठवडय़ात सोन्याचे दर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कधीच वाढले नव्हते.

मुंबई 38500
मुंबईत मंगळवारी सोन्याचा दर प्रतितोळा 37720 रुपये इतका होता. यामध्ये 3 टक्के जीएसटी मिळून हा दर 38850 रुपये इतका पोचला. ही वाढ येत्या काही दिवसांत कायम राहील अशी लक्षणे असल्याचे जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे कुमार जैन यांनी सांगितले.

आरबीआयची खरेदी
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मार्च 2018 पासून आतापर्यंत 60 टन सोने खरेदी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या