यात्रेला गेलेल्या शेजाऱयांच्या घरी डल्ला मारणाऱया महिलेसह सोनार ताब्यात; साताऱयातील चोरीचा गुन्हा 24 तासांत उघड

कुटुंब यात्रेनिमित्त घराला कुलूप लावून गावाकडे गेले असता, साताऱयातील फ्लॅटमध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा 24 तासांत उघड झाला असून, याप्रकरणी त्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱया एका महिलेस व चोरलेले सोने गहाण ठेवून घेणाऱया सोनारास शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित सोनाराकडून गहाण ठेवलेले ते अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व महिलेकडून चोरीतील 16 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

सायली प्रणव पवार (रा. गुरुज्योती अपार्टमेंट, रामाचा गोट, सातारा) व प्रशांत विष्णू गिड्डे (रा. शनिवार पेठ, सातारा) अशी याप्रकरणी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

सातारा शहरातील रामाचा गोट परिसरातील एका अपार्टमेंटमधील एक कुटुंब घराला कुलूप लावून व चावी शेजारी ठेवून यात्रेनिमित्त 10 एप्रिल रोजी गावी गेले होते. त्यादरम्यान त्यांच्या फ्लॅटमधील कपाटातून अडीच तोळे वजनाचा राणीहार व 16 हजार रुपये रोख असा ऐवज चोरीला गेला होता. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची चौकशी करीत असताना यापूर्वी चोरीची तक्रार दाखल असलेली एक महिला त्या अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी आली असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी त्या महिलेस चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. सुरुवातीला ती उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देत होती. त्यामुळे तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने गुह्याची कबुली दिली. तसेच चोरलेले सोने गहाण ठेवल्याची माहिती दिली. त्याप्रमाणे संशयित सोनाराला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सोन्याचे दागिने, तसेच महिलेकडून चोरीतील 16 हजार रुपये हस्तगत करण्यात आले. हवालदार चंद्रकांत माने तपास करीत आहेत.

जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपकिभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, हेड कॉन्स्टेबल लैलेश फडतरे, चंद्रकांत माने, सचिन माने, पोलीस नाईक अमित माने, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, कॉन्स्टेबल सचिन पवार, स्वप्नील पवार, तसेच महिला अंमलदार माधुरी शिंदे, शुभांगी भोसले, कोमल पकार, तनुजा शेख यांनी ही कारवाई केली आहे.