
जागतिक गुंतवणूक कंपनी गोल्डमन सॅक्सने 3000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं आहे. या सगळ्यांना न्यूयॉर्कमधील मुख्यालयात एका बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं. बैठकीसाठी आल्यानंतर या कर्मचाऱ्यांना तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात येत असल्याचं पत्र त्यांच्या हाती ठेवण्यात आलं. मिटींगच्या नावाखाली नोकरीवरून काढून टाकण्याच्या या प्रकाराची जगभरातून निंदा होत आहे. या कर्मचारी कपातीचा फटका हिंदुस्थानी कर्मचाऱ्यांनाही बसला आहे. गोल्डमन सॅक्स ही आयआयटी, आयआयएम सारख्या नामांकीत संस्थांमधील विद्यार्थी भलीमोठा पगार देऊन घेत असते. यातल्या अनेकांनी नोकरी गेल्यानंतर सोशल मीडियाचा आधार घेत त्यांची व्यथा मांडली आहे.
कर्मचाऱ्याची कामगिरी समाधानकारक नसल्यास आतापर्यंत कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं जात होतं. मात्र आता सरसकट लोकांना काढून टाकण्याचा नवा प्रकार समोर आला आहे. गोल्डमन सॅक्समधून मानस रंजन पांडा यांना देखील काढून टाकण्यात आलं. पांडा हे उच्च पदावर कामाला होते. त्यांनी म्हटलंय की नोकरीवरून त्यांना का काढलं याचं कारणच त्यांना उलगडत नाहीये. गेल्याच महिन्यात त्यांना बढती देण्यात आली होती आणि या महिन्यात त्यांच्या हातावर नारळ ठेवण्यात आला. बढती मिळाल्याच्या दुसऱ्याच महिन्यात नोकरीवरून काढून टाकण्याचा हा प्रकार काय आहे हे मला अद्याप उमगत नसल्याचं पांडा यांनी म्हटलं आहे.