सुदिन सुवेळ…

प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

गोंधळदेवीला अत्यंत प्रियलोककला

महाराष्ट्रात ही कशी फुलली…?

गणांचे दल सादर करते तो ‘गोंधळ’. गोंधळाला ‘गौंडली नृत्य’ अथवा ‘गोंडली नृत्य’ असेही म्हटले जायचे. भूतमातेच्या महोत्सवात गोंडली नृत्य सादर केल्याचे उल्लेख नृत्यरत्नावली या ग्रंथात आहे. भूतमातेचा महोत्सव म्हणजेच शक्ती देवतेचा उत्सव. अंबा, भवानी, रेणुका या देवतांचे संकीर्तन ज्या विधिनाटय़ाद्वारे केले जाते त्याला गोंधळ म्हणतात. गोंधळ हा कुळधर्म कुळाचार असून लग्न-मुंजीच्या प्रसंगी खंडोबाच्या जागरणाबरोबरच देवीचा गोंधळ घातला जातो. परशुराम हा आपला मूळ पुरुष असल्याचे गोंधळी सांगतात. आपली उत्पत्ती जमदग्नी आणि रेणुका यांच्यापासून झाली आहे अशी त्यांची धारणा असते.

गोंधळी हे लोकसंस्कृतीचे उपासक असून त्यांना आपण लोकपुरोहित किंवा लोकदीक्षित म्हणू शकतो. गोंधळ हा कुळधर्म-कुळाचार मराठी लोकसंस्कृतीत लोकप्रिय होता. आणि आजही आहे. भागवत संप्रदायी संतांनी आध्यात्मिक उद्बोधनासाठी गोंधळाचे रूपक घेतले. संत एकनाथांनी गोंधळावर रूपक केले आहे.

‘योगिनीचक्र’ किंवा ‘शक्तिचक्रमेळ’ हे गोंधळाच्या संदर्भात आलेले शब्द भुतावळीचे-भूतपिशाचदिकांच्या समूहांचे द्योतक आहे. कुंभ-निकुंभांना शिवाचे वरदान लाभलेले असल्यामुळे, त्यांचे रक्तबिंदू भूमीवर पडताच त्यांतून नवनवे राक्षस निर्माण होत असत. म्हणून त्यांचे रक्तबिंदू भूमीवर पडण्यापूर्वी प्राशन करण्यास ही भुतावळ युद्धास सिद्ध होते. प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्यानंतर या भुतावळीचे कार्य सुरू होते.

गोंधळाचे प्रकार दोन. एक कदमराई गोंधळ आणि दुसरा म्हणजे रेणुराई गोंधळ. तुळजाभवानीचे उपासक हे कदमराई गोंधळ सादर करतात. त्याला ‘हरदासी गोंधळ’ असेही म्हणतात. रामायण, महाभारत, पुराण यांतील एखादे व्याख्यान लावून कदमराई गोंधळ घातला जातो. रेणुकेचे उपासक रेणुराई गोंधळ सादर करतात. याला आरतीचा गोंधळ असेही म्हणतात. शारदीय नवरात्रात अथवा चैत्रातल्या नवरात्रात आरतीचा गोंधळ सादर केला जातो. चव्हाण, कदम अशी आडनावे असलेले गोंधळी हे मुख्यतः कदमराई गोंधळी असतात. तर पाचंगे, रेणुके अशी आडनावे असलेले गोंधळी हे रेणुराई गोंधळी असतात. इंडिअन नॅशनल थिएटर लोककला संशोधन विभागातर्फे राजारामभाऊ कदम यांच्या गोंधळाचे कार्यक्रम अनेकवार आयोजित केले गेले त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन पुढे लोक शाहीर विठ्ठल उमप जांभूळ आख्यान हे सुरेश चिखले लिखित नाटक सादर करू लागले.

गोंधळी समाजातील अनेक तरुण आजही शिक्षण घेत व्यवसाय म्हणून गोंधळ ही लोककला सादर करीत आहेत. त्यात घाटकोपरचे शंकर प्रभाकर गणाचार्य, शिवडीचे राजू सुदाम शिंदे, एकनाथ उबले, तानाजी शिंदे आदी गोंधळय़ांची नावे घेता येतील. लग्नसराईत आणि नवरात्रात गोंधळाला अधिक मागणी असते. हल्ली सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातील कार्यकर्तेही अन्य करमणुकीच्या कार्यक्रमांसोबत अथवा रास गरब्यासोबत गोंधळाचे कार्यक्रम आयोजित करू लागले आहेत. असे शंकर गणाचार्य यांनी सांगितले.

गण, देवतांना अवाहन, देवी माहात्म्य, कथा, आरती हा गोंधळाचा आविष्कारक्रम असतो. गोंधळाच्या पदांना अलीकडे चित्रपट गीतांच्या चाली लावल्या जातात.

अभंगांमध्येही रूपके…महाराष्ट्राच्या लोकधर्मात गोंधळ इतका प्रसिद्ध होता की संतांच्या अभंगांमध्येही गोंधळावर रूपके आहेत. मुंबईतदेखील विविध जातिजमातींमध्ये गोंधळ घालण्याचा कुळधर्म कुळाचार आहे. मुंबईत आरतीचा गोंधळ घालणारे गोंधळीदेखील आहेत. डवरी गोसावी मुडळी देखील उपजीविकेचे साधन म्हणून गोंधळ सादर करतात. परभणीचे गोंधळमहर्षी राजाराम भाऊ कदम यांनी गोंधळ आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय केला. त्यांना अतिशय प्रतिष्ठेचा भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. तसेच पॅरिस येथे भारत महोत्सवात त्यांनी आयफेल टॉवरसमोर गोंधळ सादर केला होता. त्यांच्या घरी सात पिढय़ांच्या गोंधळाची परंपरा असून ते कदमराई गोंधळी आहेत. जांभूळ आख्यानही गवळणदेखील राजाराम भाऊ सादर करीत असत. त्यात राधेचे वात्सल्य आणि शृंगार या दोन्ही छटा आपल्या आहार्य, आंगिक, वाचिक अभिनयातून उभे करीत असत.

आपली प्रतिक्रिया द्या