पतीच्या निधनानंतर जिद्दीनं उभी राहिली, 3 महिन्यांपूर्वी पोलिसात भरती झाली; कुटुंबाला भेटायला आली अन् काळानं झडप घातली

गोंदिया जिल्ह्यात शुक्रवारी शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 11 प्रवासी ठार झाले. अनेक जण जखमी असल्याने मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बस अपघातात अनेकांनी घरातील कर्ती व्यक्ती गमावली. अनेकांची स्वप्न, कुटुंब उद्ध्वस्त झाली. यापैकीच एक सूर्यवंशी कुटुंब आहे. पतीच्या निधनानंतर जिद्दीने उभी रहात पोलिसात भरती झालेल्या स्मिता सूर्यवंशी यांना अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

स्मिता सूर्यवंशी या गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील रहिवासी होत्या. त्यांचे पती पोलीस विभागात कार्यरत होते. मात्र एका आजारपणात त्यांचे निधन झाले. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या स्मिता सासू-सासरे आणि तान्हुल्यासोबत हलाखीचे जीवन जगत होत्या. तीन महिन्यांपूर्वीच पोलीस मुख्यालय गोंदिया येथे त्यांना शिपाई म्हणून नोकरी मिळाली.

कुटुंबाला भेटून त्याने नोकरीवर जाण्यासाठी निघाल्या होत्या. अर्जुनी मोरगाववरून त्या साकोलीला गेल्या आणि तिथून गोंदियाला जाण्यासाठी त्यांनी शिवशाही बस पकडली. मात्र अर्जुनी तालुक्यातील खजरी आणि डव्वा गावाजवळ बसचा अपघात झाला.

अपघात इतका भयंकर होता की, बस रस्त्याच्या कडेला अक्षरशः पलटी झाली. बस वेगात असल्यामुळे बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. वेगामुळे बसमधील अनेकांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

मृतांची नावे –

1) स्मिता विक्की सूर्यवंशी (वय – 32, रा. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया)
2) मंगला राजेश लांजेवार (रा. पिपरी, जि. भंडारा)
3) राजेश देवराम लांजेवार (रा.- पिपरी, जि. भंडारा)
4) कल्पना रविशंकर वानखेडे (वय – 65, रा. वरोरा, जि. चंद्रपूर)
5) रामचंद्र कनोजे (वय – 65, रा. चांदोरी, ता. साकोली, जि. भंडारा)
6) अंजिरा रामचंद्र कनोजे (रा. चांदोरी, ता. साकोली, जि. भंडारा)
7) आरिफा अजहर सय्यद (वय – 42, रा. घोटी, ता. गोरेगाव, जि. गोंदिया)
8) अजहर अली सय्यद (वय – 45, रा. घोटी, ता. गोरेगाव, जि. गोंदिया)
9) नयना विशाल मिटकर (वय – 35, राहणार- बेसा, नागपूर)

(दोन जणांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत)