अनोखा शैक्षणिक उपक्रम

421

<< नवी उमेद >> आशय गुणे

मागच्याच आठवड्यात कामानिमित्त नंदुरबार जिह्यात  जाण्याचा योग आला. तसे खान्देशातील या जिह्याबद्दल बरेच ऐकून होतो आणि त्याची झलक तिथे गेल्यावर बघायला मिळालीच! ‘प्रथम’ या आमच्या संस्थेच्या ‘लायब्ररी’ कार्यक्रमाची एक प्राथमिक समीक्षा करायची होती. हा कार्यक्रम तिथल्या गावातील खेड्यांमधील मुलांना वाचनाची आणि एकत्र मिळून अभ्यास करायची आवड व सवय लागावी यासाठी राबविला जातो आहे. त्याव्यतिरिक्त गावातील मोठ्यांचा आणि विशेषतः महिलांचा आणि एकूण समूहाचा त्यात सहभाग असावा हादेखील त्या मागचा उद्देश आहे. परंतु त्याव्यतिरिक्त अजून एका गोष्टीने माझे लक्ष वेधून घेतले. ते इतके प्रभावी होते की ते आता इथे मांडत आहे.

या जिह्यातील काकर्डे या गावात गेलो असताना मला एक छोटी पाण्याची टाकी दिसली. त्या टाकीवर एक गणित मांडले होते. ‘प्रथम’अंतर्गत सुरू असलेल्या  शैक्षणिक कार्यक्रमातील गणिताच्या वर्गाची ती ‘पाटी’ होती! ‘प्रथम’ या संस्थेचे कार्य या जिह्यात आणि तसे पाहिले तर साऱ्या देशात गेली अनेक वर्षे सुरू आहे. पण इथे एक लक्षात घेतले पाहिजे की हे शैक्षणिक कार्य एका वेगळ्या अंगाने इथे घडते आहे. कारण इथे भर acivity based learning वर आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर इथे दिलेले चित्र आपल्याला पाहता येईल. यात ४५ या आकड्यांपर्यंत पोहोचण्याचे वेगवेगळे मार्ग दाखवले आहेत. हीच मुलांसाठीची ‘ऑक्टिव्हिटी’ आहे. असे केल्याने मुलांना गणिताचा अंदाज तर येतोच, पण त्याच्या बरोबर एक उत्तर येण्यासाठी किती तरी वेगळे मार्ग आहेत याचीदेखील समज येते. अशा प्रकारचा अभ्यास गावात अनेक ठिकाणी सुरू असतो. बऱयाच वेळेस ‘वॉल पेंटिंग’ ( wall painting) चा उपयोग करून मुलांचा सराव घेतला जातो. हा सारा सराव सुरू असताना एक गोष्ट मात्र अगदी ठळक आहे. ती म्हणजे या शिक्षणाच्या प्रक्रियेत जे ज्ञान निर्माण होते ते या मुलांकडूनच! अजून एक अशी ऑक्टिव्हिटी आहे जिथे एखादे अक्षर लिहिले जाते आणि मुलांना त्याच्यापासून शब्द बनवायला सांगितले जातात. अशा वेळेस मुलांकडून त्यांना माहिती असलेल्या/नसलेल्या बऱ्याच शब्दांची उजळणी होते. विशेष म्हणजे हे ज्ञान त्यांच्यात असते आणि अशा वेळेस ते सर्वांसमोर येते! भाषा आणि गणितासंबंधित या अभ्यासाव्यतिरिक्त मुलांचे सामान्य ज्ञान वाढेल याचीदेखील काळजी घेतली जाते. काही दिवस असे असतात जेव्हा मुलांचे गट तयार केले जातात आणि त्यांना गावातील काही विशेष लोकांना भेटी द्यायला सांगितल्या जातात. या लोकांमध्ये शेतकरी, पोलीस, बँक कर्मचारी, कारागीर यांचा समावेश असतो. मुलं तिथे जाऊन त्यांना त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल प्रश्न विचारतात आणि संवाद वाढवतात. हा संवाद वाढत जात असताना मुलांना आपल्या गावातील या लोकांबद्दल तर माहिती मिळतेच, परंतु त्यांच्या एकूण सामान्य ज्ञानातदेखील भर पडते! हे ज्ञान अर्थात ‘पुस्तकी’ नसते. परंतु मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नक्कीच उपयोगी असते. शिवाय ज्यांना हे प्रश्न विचारले जातात त्यांनादेखील आपण काय करतो आहोत हे सांगताना एक वेगळाच आनंद होतो. कारण अशी माहिती त्यांना सहसा कुणी विचारत नाही.

ही अभ्यासाची पद्धती शाळेला पर्याय अजिबात नाही. उलट शाळेच्या अभ्यासाला पूरक आहे. आपल्याकडे शिक्षणासंबंधीचे अहवाल येत असतात आणि त्यात बऱ्याच वेळेस मुलांना लिहिताना, वाचताना किंवा गणिते सोडविताना येणाऱ्या अडचणी किंवा काही बाबतीत असफलता नमूद होते. ग्रामीण भागात हे अधिक आढळते. त्यामुळे अशा निराळ्या पद्धतीने मुलांचा अभ्यास घेणे आणि मुख्य म्हणजे त्यांना विचार करायला लावणे आणि मनात कुतूहल निर्माण करणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा या पार्श्वभूमीवर मला हे कार्य दिलासा देणारे तर वाटलेच पण एक नवी उमेद देणारेदेखील जाणवले. नंदुरबारसारख्या दुर्गम भागात सुरु असलेल्या आमच्या या कार्याला शुभेच्छा देऊन मी आनंदाने मुंबईला परतलो.

 

आपली प्रतिक्रिया द्या