समाजाचे एकत्रित प्रयत्न आणि शासनावर वॉच ठेवला तरच सुशासन निर्माण होऊ शकते. सुशासनासाठी केवळ पाच वर्षांतून एकदा मतदान करून चालणार नाही, तर शासन निर्णय प्रक्रियेत सातत्याने सहभागी झाले पाहिजे. चुकीच्या धोरणांवर शासनाला जाब विचारला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असा सल्ला सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिला.
सरहद संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या हिंदुस्थानचे माजी गृहसचिव माधव गोडबोले स्मृती व्याख्यानात ‘हरवलेले सुशासन’ या विषयावर मुंढे बोलत होते. माधव गोडबोले यांच्या कन्या मीरा कृष्णमूर्ती, सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, शैलेश पगारिया, लेशपाल जवळगे यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार राजू परूळेकर यांनी ऑनलाइनद्वारे उपस्थितांशी संवाद साधला.
तुकाराम मुंढे म्हणाले, शासनाच्या निर्णय प्रक्रियेत आपण सक्रिय सहभागी होतो का? असा प्रश्न नागरिकांना पडला पाहिजे. शासनाने घेतलेल्या निर्णायक धोरणांचा समाजातील प्रत्येक व्यक्तीवर परिणाम होत असतो. त्यामुळे केवळ पाच वर्षांतून एकदा मतदान करणे एवढीच आपली जबाबदारी नाही, तर प्रशासनावर वॉच ठेवला पाहिजे. राज्यातील सुशासन हरवले आहे किंवा नाही हे ठरवण्याची जबाबदारी समाजाची आहे. सुशासन निर्माण करण्यासाठी समाजातील प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करणे, त्यात पारदर्शकता आणणे, नागरिकांनी या निर्णय प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
संजय नहार म्हणाले, सध्याची प्रशासकीय परिस्थिती भयावह आहे. अशा परिस्थितीत सुशासनासाठी लढाई लढणे आवश्यक असून, ही जबाबदारी तुमची- आमची आहे. ही लढाई दीर्घकालीन आहे. ही लढाई लढताना निराशा येईल; पण आपण प्रयत्न करून पुढे गेले पाहिजे. व्यक्तिगत बदलाची कामगिरी जेवढी महत्त्वाची तेवढीच व्यवस्था बदलाची कामगिरीही महत्त्वाची आहे. आजच्या कार्यक्रमाला जी गर्दी जमली आहे, ती राज्याचे तुकडे पाडण्यासाठी टपलेल्यांसाठी संदेश आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विद्यार्थ्यांनो, सुशासन निर्माण करण्याचे ध्येय ठेवा
स्पर्धा परीक्षा वेळेत होणे, निवड झालेल्या उमेदवारांना वेळेत नियुक्ती मिळणे हा विद्याथ्यांचा अधिकार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अधिकारासाठी आंदोलन केलेच पाहिजे. मात्र, विद्यार्थ्यांनी सुशासन निर्माण करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. प्रशासनात चांगले काम करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असते. नागरिकांच्या करामधून अधिकाऱ्यांना वेतन मिळते, याचे भान ठेवणे गरजेचे आहे, असा सल्लाही मुंढे यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला.
व्याख्यान ऐकण्यासाठी टिळक स्मारकात तोबा गर्दी
टिळक स्मारक सभागृहात तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने सभागृह हाऊसफुल्लपेक्षाही हाऊसफुल्ल झाले होते. सभागृहात उभे राहायलाही जागा शिल्लक नव्हती. खुच्र्यांमध्ये असलेल्या मोकळ्या जागाही विद्यार्थ्यांनी फुल्ल झाल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना सभागृहाच्या मंचावरही बसविण्यात आले होते. सभागृहात जेवढी गर्दी जमली होती, तेवढीच गर्दी सभागृहाबाहेरही होती.