१ जानेवारी २०००ला जन्म झालेल्यांनो, इकडे लक्ष द्या!

23

सामना प्रतिनिधी । नगर

जन्मस्थळ व जन्मवेळ यावरून प्रत्येकाची कुंडली बनवली जाते. २१व्या शतकाच्या पहिल्याच दिवशी जन्मलेल्या म्हणजे १ जानेवारी २००० रोजी जन्मलेल्या व ज्यांची १ जानेवारी २०१८ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होत आहे, अशा एक हजार युवकांचा शोध घेऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. आगामी काळात हे नवमतदार केंद्रीय निवडणूक आयोगाचे विशेष दूत म्हणून काम करतील, याबाबतही जागृती करावी व जास्तीत जास्त संख्येने मतदार यादीत नोंद करण्यात यावी, असे आदेश राज्य शासनाच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने दिले आहेत.

सध्या सर्वत्र मतदार यादयांचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम आखण्यात आला आहे. मतदारांची नोंदणी करणे, वगळणे अशी प्रक्रिया सातत्याने सुरू असते. २१व्या शतकाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी २००० रोजी जन्मलेल्या युवक-युवती २०१८ सालच्या पहिल्याच दिवशी वयाची १८ वर्षे पूर्ण करून १९व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. या युवक, युवतींचा शोध घेऊन त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहनपर मोहीम राबविण्याचा आदेश उपसचिव अ. ना. दळवी यांनी दिला आहे.

हिंदुस्थानात दरवर्षी ७४ हजार मुलांचा जन्म होतो. याचा अर्थ प्रत्येक राज्यात अंदाजे २ हजार, तर प्रत्येक जिह्यात १०० याप्रमाणे एक हजार मतदार असावेत, अशी अपेक्षा आहे. मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर संकेतस्थळ व सोशल मीडियाच्या माध्यमातून एक हजार मतदारांना मतदार नोंदणीसाठी आमंत्रित करावे, तसेच ग्रामपंचायत, दवाखाने, जन्म-मृत्यूचे दाखले देणारे प्राधिकारी आदीच्या माध्यमातूनही एक हजार मतदारांचा शोध आवश्यक आहे. या प्रयत्नांना अनुसरून अशा मतदारांचा घरी जाऊन बीएलओंनी त्यांचा सत्कार करावा, तसेच आगामी राष्ट्रीय मतदार दिवस, २०१८ रोजी तरुण मतदारांच्या समवेत त्यांना ‘मी हिंदुस्थानचा सहस्रक मतदार आहे’, असे लिहलेला खास बॅच देऊन सत्कार करण्यात यावा. अशा मतदारांनी त्यांचे छायाचित्र व मतदार ओळखपत्र त्यांच्या फेसबूक पेजवर टाकावे व संबंधितांना टॅग करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावे. अशा मतदारांना वैयक्तिकपणे जिल्हा निवडणूक अधिकाऱयांनी प्रमाणपत्र द्यावे, अशा सूचनाही आयोगाने दिल्या आहेत. या संदर्भात महाविद्यालयात किंवा योग्य ठिकाणी कॅम्पस ऍम्बेसिटर म्हणून अशा मतदारांची नेमणूक करावी, असेही निर्देश दिले आहेत. केलेल्या कामाचा अहवाल सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या