स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंदुस्थानी संगीतवाद्यांच्या परंपरेचे गूगलच्या डूडलमधून दर्शन

505

देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना गूगलनेही आपल्या डूडलमधून हिंदुस्थानी स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंदुस्थानच्या विविधतेतील एकतेचे दर्शन संगीतवाद्यांतून घडवले आहे. विविध मान्यवरांच्या जंयती आणि स्मृतीदिनानिमित्त गूगल विशषे डूडल बनवून मान्यवरांना आदरांजली अर्पण करत असते. गूगलचे सर्वच डूडल आकर्षक असतात आणि त्यांची चर्चाही होत असते. आता हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गूगलने बनवलेले डूडल नेटकऱ्यांचे आकर्षण ठरले आहे. या डूडलमध्ये हिंदुस्थानच्या संगीतवाद्यांची झलक आहे. त्यात हिंदुस्थानी संगीतातील आणि लोकवाद्ये दाखवण्यात आली आहेत.

स्वांतत्र्यदिनानिमित्त गूगलने बनवलेले हे विशेष डूडल सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. मुंबईतील सचिन घाणेकर यांनी यांनी या डूडलचे डिझाइन तयार केले आहे. यात देशातील विविध संगीतवाद्यांची झलक आहे. आपल्या विविध लोककलांमधून हे डूडल बनवण्याची प्रेरणा मिळाल्याचे घाणेकर यांनी सांगितले. या डूडलवर क्लिक केल्यानंतर स्वातंत्र्यदिनाबाबतची सर्व माहिती ओपन होते. हिंदुस्थानच्या विविध भागात वापरली जाणारी संगीतवाद्ये आणि हिंदुस्थानी संगीताची पंरपरा या डूडलमधून दिसते. कोणत्याही शुभकार्यावेळी वाजवण्यात येणारी शहनाई, तुतारी, ढोल, वीणा, सांरगी आणि बासरी यांचा या डूडलमध्ये समावेश आहे. या वाद्यांचा वापर करून गूगल हे शब्द आकर्षक पद्धतीने बनवण्यात आले आहेत. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील संगीतवाद्यातील विविधतेतील एकता दाखवण्यासाठी हे अनोखे डूडल बनवल्याचे गूगलकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या