पहिल्या महिला फोटोजर्नलिस्ट होमी व्यारावाला यांना गुगलचा सलाम

32
९ डिसेंबर २०१७ - गुगलने हिंदुस्थानच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्ट होमी व्यारावाला यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त डुडलद्वारे त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आज पत्रकारिता क्षेत्रामध्ये महिला मोठ्या आत्मविश्वासाने आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहेत. मात्र एक काळ असा होता जेव्हा एखादी महिला फोटो जर्नलिस्ट असणं हे काही आजच्यासारखं सोपं नव्हतं. अशा काळात जुन्या विचारसरणीला छेद देत होमी व्यारावाला यांनी फोटो जर्नालिझममध्ये करिअर करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि त्या देशाच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्ट झाल्या. गुगलने आज हिंदुस्थानच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्ट होमी व्यारावाला यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त डुडलद्वारे त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.

९ डिसेंबर १९१३ रोजी होमी व्यारावाला यांचा जन्म गुजरातच्या नवसारीतील एका मध्यमवर्गीय पारसी कुटुंबात झाला. पुढे त्यांनी मुंबईत शिक्षण पूर्ण केले. होमी यांना ‘डालडा १३’ या टोपणनावाने ओळखले जात होते. १९४२ मध्ये त्यांनी दिल्लीच्या ब्रिटीश इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसमध्ये फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर हिंदुस्थानातील अनेक ऐतिहासिक घटनांच्या त्या साक्षीदार होत्या.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकवण्यात आला, तेव्हा होमी उपस्थित होत्या. राष्ट्रपती भवनात लॉर्ड माउंटबॅटन सलामी स्वीकारताना, पंडित नेहरू आणि त्यांची बहिण विजयालक्ष्मी यांची गळाभेट, नेहरूंचे नातवंडांसोबतचे क्षण, पंडित नेहरु, लाल बहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी यांचे अंत्यसंस्कार यासारखे अनेक महत्वाचे फोटो होमी यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

१९३८ साली जेव्हा फोटोग्राफी हे पुरुषांचंच क्षेत्र मानलं जाई, त्या काळात होमी यांनी व्यावसायिक स्तरावर फोटोग्राफीला सुरुवात केली. होमी यांनी १९३८ ते १९७३ या काळात पत्रकारितेच्या क्षेत्रात महत्वाचं काम केलं आहे. २०११ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. १५ जानेवारी २०१२ रोजी वडोदरा येथे त्यांचे निधन झाले. आज त्यांच्या जयंतीदिनी गुगलने ‘फर्स्ट लेडी ऑफ द लेंस’ म्हणत त्यांना सन्मानित केलं आहे. मुंबईचे कलाकार समीर कुलावूर यांनी हे डुडल बनवलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या