10 लाख ग्रामीण महिलांना व्यवसायासाठी ‘गूगल’चा हात, वुमेन विल नावाचे नवे पेज

गूगल कंपनीने हिंदुस्थानच्या ग्रामीण भागातील 10 लाख महिलांना उद्योगासाठी मदत करायची घोषणा केली आहे. त्यासाठी ‘वुमेन विल’ नावाचे वेब व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.

दरवर्षी होणारा गूगल फॉर इंडिया कार्यक्रम यावर्षी व्हर्च्युअली आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात गूगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई आणि उद्योगपती रतन टाटा आदी दिग्गज सहभागी झाले. यावेळी एक लाख महिला शेतकऱयांसाठी गूगलकडून 50 हजार डॉलरच्या निधीची घोषणा करण्यात आली. महिलांच्या डिजिटल आणि आर्थिक साक्षरतेसाठी नेसकॉम फाऊंडेशनला हा निधी दिला जाईल.

इंटरनेट साथीला चांगला प्रतिसाद

गूगलने इंटरनेट साथी उपक्रम 2015 मध्ये सुरू केला आहे. गूगल इंडियाचे हिंदुस्थानातील व्यवस्थापक आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी कंपनीच्या या अभियानाची सुरुवात केली होती. इंटरनेट साथीमध्ये आता 80 हजार स्वयंसेवक आहेत, हा कार्यक्रम देशातील तीन लाख गावांपर्यंत पोहचला आहे. या कार्यक्रमातंर्गत दुर्गम भागातील महिलांना सशक्त करण्यासाठी मदत होत आहे. गूगल इंटरनेट साथी अभियान देशातील अनेक राज्यांत पसरला आहे. यामध्ये पंजाब, महाराष्ट्र, ओडिशा आणि राजस्थानसारख्या राज्यांचा समावेश आहे. सुरुवातीला दोन हजार इंटरनेट साथींच्या समन्वयाने महिलांना सक्षम केले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या