गुगल मॅपने दाखवलेल्या रस्त्याने गेले….कारसह कालव्यात पडले…

माहिती नसलेल्या मार्गावरून जाताना किंवा रस्ता चुकल्यावर आपण कोणाला तरी रस्ता विचारतो किंवा गुगल मॅपवर रस्ता शोधतो. अनेकदा प्रवासात गुगल मॅपची मदत होते. मात्र, अनेकदा गुगल मॅप लांबचा किंवा कठीण रस्ता दाखवतो, अशी अनेकांची तक्रार आहे. मात्र, गुगल मॅपवर विश्वास ठेवत त्याच रस्ताने पुढे जाताना कारचालकाला अडचणींचा सामना करावा लागला आहे.

केरळमधील चार जणांचे कुटुंबिय गुगल मॅपने रस्ता शोधत कारने निघाले होते. त्यानंतर जे घडले त्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. चालक गुगल मॅपने दाखवलेल्या रस्त्याने जात होता. त्यावेळी अचानक कार कालव्यात पडली. त्यावेळी स्थानिकांना या दुर्घटनेची माहिती मिळाली आणि त्यांनी कारमधील चौघांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या चार जणांच्या कुटुंबियांमध्ये एक तीन महिन्यांच्या मुलाचाही समावेश आहे.

कार चालकाने सांगितले की, गुगल मॅपने दाखवलेल्या रस्त्याने जात होता. त्यामुळे कार कालव्यात पडल्याचे त्याने सांगितले. हे सर्व केरळहून कुंबनाडला जात होते. त्यांची कार कालव्याजवळ पोहचताच गुगल मॅपने सरळ जाण्यास सांगितले. कारचालकानेही रस्त्याचे वळण लक्षात न घेता कार सरळ नेली. त्यामुळे कार थेट कालव्यात जाऊन पडली. काही जणांनी यात कारचालकाची चूक असल्याचे म्हटले आहे.

याआधीही गुगल मॅपने दाखवलेल्या रस्त्याने गेल्यामुळे अनेकदा अपघात घडल्याचे किंवा चुकीच्या रस्त्यावर आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अमेरिकेमध्ये गुगल मॅपने दाखवलेल्या रस्त्याने जाताना कार थेट नदीवर गोठलेल्या बर्फात अडकली होती. त्यामुळे गुगल मॅपने दाखवलेल्या रस्त्याने जाताना काळजी घेण्याची गरज आहे.