रेल्वे स्थानकांवर मिळणारी ‘फ्री वायफाय’ सेवा बंद होणार, कारण…

933

रेल्वे स्थानकांवर आपण लवकर पोहोचलो किंवा रेल्वे उशिरा येणार असेल तर बऱ्याचदा प्रवासी रेल्वे स्थानकावर गुगल (Google)कडून फुकटात उपलब्ध करून देण्यात आलेल्या वायफाय सेवेचा लाभ घेताना दिसतात. मात्र आता तुम्हाला असे करता येणार नाही. कारण रेल्वे स्थानकांवर मिळणारी फ्री वायफाय सेवा बंद करण्याचा निर्णय गुगल (Google) या दिग्गज कंपनीने घेतला आहे. कंपनी 400 पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांवर ही सेवा विनाशुल्क देत होती, मात्र आता ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टेलिकॉम कंपन्या बाजारामध्ये स्वस्तात इंटरनेट प्लॅन्स उपलब्ध करून देत असल्याने हा निर्णय घेतला आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. स्वस्त इंटरनेटमुळे रेल्वे स्थानकांवर आता फ्री वायफाय देण्याची आवश्यकता राहिलेली नाही. परंतु रेलटेलने मात्र प्रवाशांना फ्री वायफाय सेवा यापुढेही मिळत राहील असे स्पष्ट केले आहे. फ्री वायफायसाठी गुगलने हिंदुस्थानी रेल्वे आणि रेलटेलसोबत करार केला होता आणि आता तो संपला आहे. गुगलने स्वस्त इंटरनेटचा दाखला देत हा करार वाढवला नसला तरी रेलटेल मात्र फ्री वायफाय यापुढेही देत राहणार आहे.

free-wifi

गुगलने काय म्हटलं?
गुगलने आपल्या अधिकृत ब्लॉगवर म्हटले की, हिंदुस्थानमध्ये पूर्वीपेक्षा आता इंटरनेट अधिक स्वस्त झाले आहे. प्रत्येक व्यक्ती इंटरनेटचा वापर करत आहे. तसेच ट्रायने गेल्या पाच वर्षांमध्ये इंटरनेट प्लॅन्सच्या किंमती पूर्वीपेक्षा 90 टक्के कमी केल्या आहेत, त्यामुळे रेल्वे स्थानकांवर गुगलकडून देण्यात येणारी फ्री वायफाय सेवा यापुढे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2015 पासून ही सेवा सुरू करण्यात आली होती. गुगल हळूहळू ही सेवा बंद करणार आहे.

wifi

प्रत्येक व्यक्ती किती डाटा वापरतो?
एका अहवालानुसार, हिंदुस्थानातील सरासरी प्रत्येक व्यक्ती महिन्याला साधारणता: 10 जीबी डाटा वापरतो. येणाऱ्या काळात हा आकडा प्रत्येक व्यक्तीमागे 20 जीबीपर्यंत वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. ‘द हिंदू‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या