गुगल, अ‍ॅमेझॉनसारख्या टेक कंपन्या लवकरच देशातील कर्मचारी भरती थांबवण्याची शक्यता

अमेरिकेतील सुप्रसिद्ध सिलिकॉन व्हॅलची अर्थव्यवस्था मंदीच्या लाटेत गटांगळ्या खात आहे. गेल्या काही महिन्यांपासून सिलिकॉन व्हॅली बँकेच्या व्यवहारात प्रचंड मंदी आली होती. याचा परिणाम हिंदुस्थानी तंत्रज्ञान क्षेत्रावरही झाला आहे. Google, Amazon, Meta, Apple यासारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी हिंदुस्थानातील नियुक्ती थांबवण्याची शक्यता आहे. 2023 मधील कर्मचारी भरतीमध्ये लक्षणीय घट झाल्याचे समोर आले आहे.

इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या अहवालानुसार, जगभरात सुरू असलेल्या आर्थिक मंदीमुळे या टेक कंपन्यांनी नोकर भरती थांबविण्याच्या विचारात आहेत. 2023 मध्ये 2022 च्या तुलनेने कर्मचारी नियुक्तीची 90 टक्क्यांनी घट झाली आहे. दिलेल्या अहवालानुसार XPheno या स्टाफिंग फर्मकडून गोळा केलेल्या माहितीनुसार, देशात सध्या टेक कंपन्यांकडे 200 हून कमी जागा उपलब्ध आहेत.

माहिती तंत्रज्ञान तंज्ञ्यांच्या मते, पुढील सहा महिने नोकरभरतीबाबत अशीच परिस्थिती राहणार आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे कर्मचाऱ्यांचा वापर सुधारीत केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची गरज भासत नसल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. पुढे, आर्थिक मंदी, संभाव्य मंदीच्या चिंतेमुळे तंत्रज्ञान क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. 2022 डिसेंबर पर्यंत मोठ्या टेक कंपन्यांकडून कर्मचारी भरतीचे प्रमाण 78 टक्क्यांनी घसरले होते.

या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, जागतील स्तरावरील मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅमेझॉन, मेटा, गुगल सारख्या अनेक कंपन्यांनी शेकडो हजार नोकऱ्या कमी केल्या आहेत. प्रामुख्याने फेसबुक, अ‍ॅमेझॉन, अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, नेटफिल्क्स, आणि गुगल या प्रमुख टेक कंपन्यांमध्ये संपूर्ण हिंदुस्थानातून केवळ 150,000 पेक्षा कमी कर्मचारी आहेत.