प्रा. गोपाळ दुखंडे

जे. डी. पराडकर

समाजवादी चळवळीतील लढवय्ये विचारवंत आणि ज्येष्ठ नेते प्रा. गोपाळ दुखंडे यांच्या जाण्याने एक धगधगता कार्ययज्ञ निमाला आहे. १९७१च्या दरम्यान बाबा आमटे चंद्रपूरला दरवर्षी युवकांसाठी श्रमसंस्कार शिबीर घ्यायचे. या शिबिरात सहभागी झालेल्या तरुणांना आपण देशासाठी काहीतरी केले पाहिजे असे प्रकर्षाने वाटू लागले. यातून युवक क्रांतीचा जन्म झाला. यामधून जे विविध नेतृत्व पुढे आले त्यातीलच एक म्हणजे प्रा. गोपाळ दुखंडे होते. सिंधुदुर्गमधील मालवणच्या त्रिंबक गावचे सुपुत्र असलेल्या दुखंडे यांचे वडील गिरणी कामगार होते. गोपाळ दुखंडेंचे प्राथमिक शिक्षण मालवण तालुक्यातच झाले. १९५६ सालापासून राष्ट्रसेवा दल, समाजवादी युवाजन सभा, युवक क्रांती दल तसेच समाजवादी पक्षात कार्यरत असणाऱया दुखंडे यांच्या कार्याचा पाया शिक्षण आणि ग्रामीण भागाचे प्रश्न असाच राहिला.

रत्नागिरीतील मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र हे गोपाळ दुखंडेंच्या रस्त्यावरील लढाईचे फलित होय. मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत जव्हार-मोखाडय़ापासून सावंतवाडीपर्यंतचा भाग असल्याने छोटय़ा छोटय़ा कामांसाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना ४०० कि.मी. अंतर कापून मुंबई गाठावी लागे. रत्नागिरीत हे उपकेंद्र मिळाल्याने ही यातायात थांबली हे श्रेय दुखंडे सरांचेच. १९८३च्या दरम्यान ‘नवा एकलव्य येत आहे, दान अंगठय़ाचे होणार नाही’ असा नारा देत कोकणात छात्र भारती ही विद्यार्थी चळवळ फोफावली. त्यामागील ऊर्जास्रोत गोपाळ दुखंडेच होते. मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य असताना दुखंडेंनी मुंबई विद्यापीठाच्या मराठीकरणासारखे अनेक विषय ऐरणीवर आणले. ग्रामीण विकास हा नवीन विषय मुंबई विद्यापीठाकडून मंजूर करून घेण्याची कामगिरी दुखंडे सरांचीच होती .

रात्रशाळेच्या प्रश्नावर १९८४-८५ साली मंत्रालयावर धडकलेला मोर्चा महाराष्ट्र आजही विसरलेला नाही. ७० रात्रशाळा बंद करण्याच्या नोटिसांबाबत या मोर्चामुळे मंत्रालयाचे दरवाजे रात्री दहा वाजता उघडले गेले हा इतिहास होता. याबरोबरच कॅपिटेशन फीविरोधीचे आंदोलन दुखंडेंच्याच नावाने ओळखले जाते. दुखंडेंनी १९९५ची विधानसभा निवडणूक लढवली. केवळ दहा हजार मते मिळून ते तिसऱया क्रमांकावर फेकले गेले, पण संघर्षाची ठिणगी कधीही विझली नाही. जनतेच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी तुरुंगवास भोगला. अखेर ७४ व्या वर्षीही  ‘और एक लढाई बाकी’ म्हणत ते लढत राहिले. गोपाळ दुखंडेंच्या पत्नी त्यांच्याबाबत म्हणत, ‘यांच्या नोकऱया कधी सुटत हेदेखील कळत नसे. संसारात त्यांची मदत झालीच नाही. आम्हाला झालेल्या पहिल्या मुलाला पाहायला ते तीन दिवसांनी आले होते’. प्रश्न कोणताही असो, तो पटला की त्याच्यासाठी हातचे राखून न ठेवता झोकून देत सघर्ष करणे, प्रसंगी त्यासाठी लढा उभारणे हेच दुखंडे सरांचे जीवन झाले होते. या लढवय्या वृत्तीनेच ते आयुष्य जगले. सामाजिक-राजकीय जीवनात तब्बल सहा दशके सक्रीय राहिले. ते जसे समाजवादी होते, गांधीवादी होते तसेच मार्क्सवादीही होते. प्रचंड ऊर्जा हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यातूनच त्यांनी शिक्षणाधिकार, आरोग्य, विकास आणि पर्यावरण, जातीभेद, असंघटित कामगार अशा अनेक प्रश्नांवर आंदोलने उभारली.रोमारोमात चळवळ भरलेले हे व्यक्तिमत्त्व एक अजब रसायन होते आणि कोकणवासीयांना त्यांचा सार्थ अभिमान वाटतो.