संकटकाळी भावाला मिळणार मदत, विद्यार्थिनींनी बनवली मेडिकल सेफ्टी राखी

रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला खास भेटवस्तू देतो. तसेच सदैव रक्षण करण्याचे वचन देतो. मात्र आता केवळ भाऊच नाही तरी बहिणीसुद्धा भावाचे रक्षण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. गोरखपूर येथील इंजिनीयरिंग कॉलेजच्या दोन विद्यार्थिनींनी भावांच्या रक्षणासाठी राखी तयार केली आहे. ही डिजिटल राखी चर्चेचा विषय ठरली आहे.

गोरखपूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट इंजिनीयरिंग कॉलेजमधील कॉम्प्युटर सायन्स व इंजिनीयरिंग विभागाची विद्यार्थिनी पूजा यादव व फार्मसी विभागातील राणी ओझा या दोघींनी मिळून ही स्मार्ट डिव्हाईस राखी तयार केली आहे. काहीतरी वेगळं करावं, या उद्देशाने त्यांनी स्मार्ट राखीची निर्मिती केली. ही राखी भावाच्या मनगटावर बांधली की ब्लू टुथ वापरून मोबाइलला जोडू शकता. स्मार्ट मेडिकल राखीमध्ये आपण डॉक्टर, रुग्णवाहिका व कुटुंबियांचे मोबाइल नंबर जोडू शकता, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत राखीवर डबल टॅप केल्यावर तुम्ही सेट केलेल्या क्रमांकाला अपडेट केले जाईल.

ही डिजिटल राखी मंजुरीसाठी कॉलेजला पाठवली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर तिचे नाव ‘स्मार्ट मेडिकल राखी’ असे ठेवण्यात येणार आहे. हे उत्पादन मार्केटमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे कॉलेजचे संचालक डॉ. एन. के. सिंह यांनी सांगितले.

– राखीवर एक बटण दिलेले आहे, जे दाबताच कुटुंबातील सदस्य, पोलीस, ऍम्ब्युलन्स आणि डॉक्टरांना लोकेशन जाईल. त्यामुळे संकटकाळी मदत मिळू शकते. सहसा बाईक किंवा कार चालवताना अपघात झाल्यास कुटुंबियांना फार उशिरा समजते. जर अशा वेळी त्वरित मदत मिळाली तर अपघातग्रस्तांचे जीव वाचवण्यात मदत होऊ शकते.

– मेडिकल सेफ्टी राखी बनवण्यासाठी 900 रुपये इतका खर्च आला आहे. राखीमध्ये ब्ल्यू टुथसह अन्य नॅनो पार्ट वापरलेले आहेत. एकदा चार्ंजग झाल्यावर साधारण 12 तास राखी वापरता येईल.