गोरेगावात धोकादायक परिस्थितीत गॅसचा काळाबाजार, आर्थिक गुन्हे नियंत्रण पथकाची धडक कारवाई

एलपीजी गॅल सिलिंडरमधील गॅस बेकायदेशीरपणे छोटय़ा बाटलामध्ये भरून ते नागरिकांना विकण्याचे काम गोरेगावात सुरू होते. कोणताही परवाना नसताना धोकादायक परिस्थितीत गॅसचा काळाबाजार करणाऱयांना आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेने पकडले. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टापून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थ नगरात एका गोदामामध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस छोटय़ा बाटलामध्ये बेकायदेशीरपणे कोणतीही काळजी न घेता भरला जातो. तसेच त्या गॅस सिलिंडरचा साठा करून मग वाटेल त्या किमतीत विकला जात असल्याची खबर नियंत्रण कक्षाचे प्रभारी निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली.

त्यानुसार पाटील, एपीआय ओम वंगगाटे यांनी गणेश डोईपह्डे, महेंद्र दरेकर, महेश कोळी, रवींद्र पुंभार, संतोष पाटील पथकासह त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी मोठय़ा सिलिंडरमधून छोटय़ा बाटलामध्ये गॅस भरला जात असल्याचे आढळून आले. तसेच त्या गोदामात सुरक्षेची कोणतीही काळजी घेण्यात येत नसल्याचेही आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी  हा धोकादायक काळाबाजार करणाऱ्या लतिफ कादिर शेलॉट याला बेडय़ा ठोकल्या आणि घटनास्थळावरून 152 एलपीजी गॅस सिलिंडर व अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या