गोरेगावच्या मोहन गोखले रोड जवळील पालिकेची जागा झाली अतिक्रमणमुक्त!

गोरेगाव पूर्व मोहन गोखले मार्ग येथील भूखंडावरील झालेले अतिक्रमण पालिकेच्या माध्यमातून हटवण्यात आले आहे. शिवाय या ठिकाणच्या बेकायदेशीर पार्किंगवरही कारवाई करण्यात येत आहे. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांनी पालिका आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून या अनधिकृत बांधकामाबाबत ‘आरे’ एमआरटीपी अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 52 मधील गोरेगाव (पूर्व) येथील मोहन गोखले पथ, धीरज व्हॅली जवळील न. भु. क्र. 596/62/अ, या ना विकासक्षेत्र आरक्षित मोकळ्या भूखंडावर सातत्याने अतिक्रमणात वाढ होत होती. यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी पी दक्षिण पालिका कार्यालयात तक्रारीही केल्या होत्या. वारंवार तक्रारी करूनही पी दक्षिण विभागाच्या अधिकार्‍यांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही. पालिकेच्या परवानगीशिवाय या सदर आरक्षित मोकळ्या भूखंडावर भूमाफियांनी अनधिकृत कब्जा करून या जागेचा वापर व्यावसायिकरणासाठी करण्यास सुरुवात केली होती. पी दक्षिण विभागाचे दुय्यम अभियंता के.जी. लिमये यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून सदर अनधिकृत जागेचा वापर करणार्‍यांविरोधात स्थानिक ‘आरे’ पोलीस स्थानकात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार वायकर यांनी तातडीने याबाबत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे तक्रार करून अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली. पालिका आयुक्तांनी याची तातडीने दखल घेत प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या