श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी

674

श्रीलंकेचे माजी संरक्षण सचिव गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. रविवारी दुपारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालात त्यांनी सत्ताधारी पक्षाचे उमेदवार सजीथ प्रेमदासा यांच्यावर मात केली. गोटाबाया श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांचे भाऊ आहेत. त्यामुळे गोटाबाया जिंकतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तमिळ टायगर्सचा खात्मा केल्यामुळे राजपक्षे गट श्रीलंकेत प्रसिद्ध आहे. सात महिन्यांपूर्वी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदान झाले होते. राष्ट्रपतीपदासाठी 32 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात होते. निवडणूक 80 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

सत्तारुढ पक्षाचे उमेदवार सजीथ प्रेमदासा यांनी पराभव मान्य केला आहे. विजयी उमेदवार गोटाबाया राजपक्षे यांना शुभेच्छाही दिल्या. राजपक्षे हे श्रीलंकेचे सातवे राष्ट्रापती असतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजपक्षे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. ‘श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाबद्दल गोटाबाया यांचं अभिनंदन. दोन्ही देश शांती, समृद्धी आणि एकमेकांच्या सुरक्षेसाठी एकत्र मिळून काम करतील अशी अपेक्षा आहे,’ असं ट्वीट नरेंद्र मोदींनी केले आहे.

राजपक्षे हे चीनचे समर्थक मानले जातात. महिंदा राजपक्षे राष्ट्रपती असतानाच चीन आणि श्रीलंका यांची जवळीक वाढली होती. त्यामुळे गोटाबाया यांच्या विजयामुळे चीन आणि श्रीलंका यांची मैत्री आणखी दृढ होण्याची शक्यता आहे. सध्या श्रीलंका चीनच्या कर्जाच्या ओझ्याखाली आहे. श्रीलंकेने हंबनटोटा बंदर विकसित करण्यासाठी चीनकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. पण कर्ज न चुकवता आल्यामुळे हे बंदरच 99 वर्षांच्या भाडेकरारावर द्यावे लागले आहे. सध्या या बंदरावर चीनचाच अधिकार आहे. त्यामुळे गोटाबाया यांच्या विजयाने या दोन देशातील संबंध दृढ होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या