सहकार खात्याचा चमत्कार, मुंबईतील ८१३ शेतकऱ्यांना कर्जमाफी!

19

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आषाढी एकादशीला पंढरपुरात ब्रह्ममुहूर्तावर कर्जमाफीपेक्षा शेतकऱयाला कर्जमुक्ती दे असे साकडे विठुरायाला घातले आणि अवघ्या काही तासांत चमत्कार झाला. दीड लाख रुपयांची कर्जमाफी मिळणाऱया राज्यातील ३० लाख ९० हजार २१६ शेतकऱयांमध्ये मुंबई शहरातील ६९४ आणि उपनगरातील ११९ जणांचा समावेश असणारी सहकार खात्याची यादी जाहीर झाली. अर्थात ही यादी दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच ट्विटवर टाकून या चमत्काराला प्रसिद्धी दिली. यामुळे कर्जमाफीतील सावळागोंधळ तर उजेडात आलाच, पण पंढरपूरपासून मंत्रालयापर्यंत सर्वत्र एकच गोंधळ उडाला. मुंबईत ८१३ शेतकरी आले कुठून आणि कोण आहेत हे प्रश्न सर्वसामान्यांनाच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनाही पडले आणि या हैराण स्थितीतच त्यांनी चौकशीचे आदेश दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही हैराण झाले. त्यांनी तातडीने चौकशीचे आदेश देऊन या चौकशीनंतरच सर्व प्रस्तावित लाभार्थ्यांची कर्जमाफी करू असे पत्रकारांना सांगितले. सरकारच्या या सावळय़ागोंधळामुळे दिवसभर राज्यभर गोंधळ सुरू होता हे नक्की!

सहकार खात्याने न वाचताच लाभार्थ्यांची यादी मुख्यमंत्र्यांना दिली आणि गंमत म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही ती न वाचताच ही यादी ट्विटवर टाकल्याचे उघड झाले आहे. कारण वाचली असती तर मुंबई व उपनगरातील शेतकरी त्यांना खटकायला हवे होते, असे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे.

ती यादीच प्रसिद्ध करा

मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या यादीनंतर सोशल मीडियावर धमाल उडाली आहे. मुंबई उपनगरापेक्षा मुंबईतील शेतकरी जास्त कसे? मुंबईत रेल्वे रुळांच्या शेजारी शेती होते. ती वगळली तर शेतीसाठी जागाच नाही, मग कर्जमाफीचे ते लाभार्थी कोण? आता मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील लाभार्थ्यांची यादीच प्रसिद्ध करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

चौकशी करूनच कर्जमाफी दिली जाईल!

आता जाहीर केलेली यादी प्रस्तावित लाभार्थ्यांची आहे. प्रत्येक शेतकऱयाच्या कर्जाची व्यवस्थित चौकशी करून मगच कर्जमाफी दिली जाणार आहे. मुंबई आणि उपनगरात शेतकऱयांना कर्जमाफी दिल्याचे यादीत दिसत आहे. या शेतकऱयांची जमीन मुंबईलगत असण्याची शक्यता आहे, या शेतकऱयांनी मुंबईतील राष्ट्रीयीकृत बँकांमधून कर्ज घेतले असण्याची शक्यता आहे. कर्जमाफी करताना प्रत्यक्ष चौकशीत सगळय़ा गोष्टी स्पष्ट होतील. मुंबईत शेतकरी आहेत का, असा प्रश्न मलाही पडला होता. मी तसं अधिकाऱयांना विचारलंही असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

जून २०१७ पर्यंतची कर्जमुक्ती मिळायलाच हवी!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी केलेल्या ४० लाख शेतकऱयांची यादी द्या, असे ठणकावले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विटरवर यादी टाकताच अनेक गोष्टी सिद्ध झाल्या. कर्जाचा बोजा असलेले ४४ लाख शेतकरी असून ३३ लाख शेतकऱयांना दीड लाखाची कर्जमाफी मिळणार आहे. त्यातही निकष असल्याने ३५ टक्के शेतकरी संख्या कमी होणार आहे. म्हणजेच अंदाजे २० लाख शेतकऱयांना कर्जमाफी मिळेल. अर्थात कर्जमाफी १२ ते १३ हजार कोटींपर्यंतच जाईल. असे असताना जून २०१७ पर्यंतची कर्जमुक्ती द्या, अशी शिवसेनेची आग्रही मागणी आहे. ती पूर्ण होण्यास काहीच हरकत नाही, असे शिवसेना नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटले आहे.

शेतकऱयांचे तीव्र आंदोलन आणि शिवसेनेचा दणका यामुळे राज्य सरकारला शेतकऱयांची कर्जमाफी जाहीर करावी लागली. मुख्यमंत्र्यांनी देशातील ही सर्वात मोठी आणि म्हणून ऐतिहासिक असे या कर्जमाफीचे वर्णन केले हाते. आज श्रीविठ्ठलाची शासकीय महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ३५ जिल्हय़ांमधील लाभार्थी शेतकऱयांची यादी ट्विटरवरून जाहीर केली. यात मुंबईतील ८१३ जणांचा समावेश असल्याचे पाहून सर्वांचेच डोळे गरगरले. सगळीकडे उलटसुलट चर्चा सुरू झाली. सरकार आणि सहकार खाते दोन्ही संशयाच्या गर्तेत सापडले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी हात वर करून अधिकाऱयांकडे बोट दाखवले तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी शेतकरी मुंबईबाहेरचे असावेत, पण बँकेकडे कर्ज मागताना त्यांनी मुंबईतील पत्ता दिला असावा असा दावा केला.

आपली प्रतिक्रिया द्या