निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान होणार नवे सीडीएस

केंद्र सरकारने निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची सीडीएसपदी (चीफ ऑफ डिफेंस स्टाफ) नियुक्ती केली आहे. जनरल बिपीन रावत यांच्यानंतर चौहान हे देशाचे दुसरे सीडीएस होत आहेत. सैन्य दलात 40 वर्षांची कारकिर्द असणारे अनिल चौहान गेल्यावर्षी सेवानिवृत्त झाले आहेत. संरक्षण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या सैन्य दलातील सर्व विभागांशी संबधित सचिवपदाची जबाबदारी ते सांभाळणार आहे. 40 वर्षांच्या कारकिर्दीत चौहान यांनी विविध कमांड साभाळल्या आहेत. जम्मू-कश्मीर आणि ईशान्य हिंदुस्थानातील दहशतवादविरोधी कारवायांचा त्यांचा दांडगा अनुभव आहे.

18 मे 1961 मध्ये जन्म झालेले अनिल चौहान 1981 मध्ये हिंदुस्थानी लष्कराच्या 11 गोरखा रायफल्समध्ये दाखल झाले होते. ते नॅशनल डिफेन्स अॅकडेमी, खडकवासला आणि इंडियन मिलिट्री अॅकेडमी देहरादूनचे माजी विद्यार्थी आहेत. मेजर जनरल पदावर असताना बारामुल्ला सेक्टरमधील इन्फट्री डिवीजनची कमान त्यांनी सांभाळी होती. तर लेफ्टनंट जनरल पदावर असताना ईशान्य हिंदुस्थानात एका कोरचे नेतृत्व केले होते. त्यानंतर सप्टेंबर 2019 पासून पूर्व कामानचे जनरल ऑफीसर कमांडिग इन चिफ बनले. ते 2021 मध्ये गेल्यावर्षी सेवानिवृत्त झाले होते. जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर 9 महिन्यांनी देशाला सीडीएस मिळत आहेत.