टंचाईग्रस्तवाड्यांत स्थानिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष

20

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

संगमेश्वर तालुक्यातील टंचाईग्रस्तवाड्यांचा आराखडा तयार असून या वाड्या टंचाईमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. टंचाई निवारण्यासाठी व कायमस्वरुपी उपाययोजनेंसाठी राज्य सरकारकडून रत्नागिरी जिल्ह्याकरीता ८ कोटी रुपये उपलब्ध झाले असून त्यापैकी ८८ लाख १६ हजार ३१८ रुपयांची तरतूद संगमेश्वर तालुक्यातील तीन टंचाईग्रस्त वाड्यांसाठी करण्यात आली आहे. यामध्ये पहील्या टप्प्यात कुटगिरी येडगेवाडी, पाचांबे नेरदवाडी, निवधे धनगरवाडी या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.

डोंगरावरील धनगरवाड्यांसाठी निकष शिथील करुन नळपाणी पुरवठा योजना कराव्यात अशी घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चालू आर्थिक वर्षात केली होती. त्या अनुषंगाने संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडी, निवधे धनगरवाडी आणि पाचांबे नेरदवाडी या मोठ्या लोकसंख्या असलेल्या वाड्यांचे जलस्वराज्य टप्पा क्र २ अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना करण्याकरीता प्रस्ताव तयार करुन शासनाला पाठवण्यात आले होते. मात्र नळपाणी योजना प्रस्तावाला मंजुरी न देता या टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये साठवण टाकी बांधावी असा आग्रह केला जात असल्याने स्थानिक ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या