तलाक तलाक तलाक म्हणाल तर ३ वर्षे तुरुंगात जाल!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

तलाक तलाक तलाक असे सांगत तलाक दिल्यास संबंधित व्यक्तीविरोधात दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल. न्यायालयात खटला चालेल आणि दोषी आढळल्यास ३ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल. केंद्र सरकार तिहेरी तलाक (ट्रिपल तलाक) ही प्रथा बंद व्हावी म्हणून हिवाळी अधिवेशनात एक विधेयक सादर करणार आहे. या विधेयकात तिहेरी तलाक देणाऱ्या व्यक्तीला ३ वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. विधेयकाचा मसुदा राज्यांना पाठवण्यात आला आहे. केंद्र सरकारने विधेयकाच्या मसुद्याबाबत राज्यांकडून लेखी अभिप्राय मागितला आहे.

‘द मुस्लिम विमेन प्रोटेक्शन ऑफ राइट्स इन मॅरेज अॅक्ट’ या नावाने हे विधेयक मांडले जाणार आहे. विधेयकातील तरतुदीनुसार, कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने तोंडी, लेखी वा मेसेजच्या (ई-मेल, एसएमएस, व्हॉट्सअॅप) स्वरूपात तलाक तलाक तलाक असे सांगत तलाक दिल्यास तो गुन्हा ठरणार आहे. या प्रकरणी दोषी व्यक्तीसाठी तीन वर्षाचा कारावास आणि दंड अशी शिक्षेची तरतूद या कायद्यात असणार आहे. दंड किती आकारण्यात यावा याचा निर्णय संबंधित न्यायालयाने घ्यावा, असेही विधेयकाच्या मसुद्यात नमूद करण्यात आले आहे.

तीन तलाक पीडित महिला स्वत:साठी आणि तिच्या अल्पवयीन मुलाच्या उदरनिर्वाहासाठी पोटगीची मागणी करू शकेल, अशी तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाचा ताबा मिळवण्याचा अधिकार विधेयकातील तरतुदीनुसार महिलेला मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या