पॉर्न वेबसाइट्सवर केंद्र सरकारची कारवाई, 67 वेबसाइट्स ब्लॉक

केंद्र सरकारने 2021 मध्ये जारी केलेल्या नवीन माहिती तंत्रज्ञान (IT) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल इंटरनेट सेवा पुरवठादारांना 67 पॉर्न वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये, दूरसंचार विभागाने कंपन्यांना पुणे न्यायालयाच्या आदेशानुसार 63 वेबसाइट काढून टाकण्यास सांगितले आहे, तर चार वेबसाइट्स उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशावर आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशांवर आधारित आहेत.

दूरसंचार विभागाने 24 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात, माहिती तंत्रज्ञान मध्यवर्ती मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचार संहिता नियम-2021 (उत्तराखंड उच्च न्यायालयाचे) नियम-3(2)(b) अनुषंगाने आणि खाली नमूद केलेल्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या महिलांच्या विनयशीलतेचा भंग करणाऱ्या काही अश्लील साहित्याच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या वेबसाइट्स आणि यूआरएल त्वरित ब्लॉक करण्याचा आदेश जारी केला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 2021 मध्ये लागू केलेल्या नवीन IT नियमांमुळे कंपन्यांना ‘एखाद्या व्यक्तीला पूर्ण किंवा अंशतः नग्न दाखवणारे’ किंवा लैंगिक कृत्य करताना दाखवणाऱ्या, त्यांच्याद्वारे प्रकाशित केलेल्या सामग्रीच्या प्रसारणाला ब्लॉक किंवा बंद करणे बंधनकारक केले आहे.