सामान्य नागरिक गॅसवर! दर महिन्याला वाढणार सिलिंडरच्या किमती

21
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

महागाईने आधीच होरपळलेल्या नागरिकांना आता दर महिन्याला खिसा आणखई खाली करावा लागणार आहे. केंद्र सरकारने अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्याचे आदेश तेल कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत दर महिन्याला ४ रुपयांची वाढ होणार आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली. ते लोकसभेत बोलत होते.

केंद्र सरकारने इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या कंपन्यांना अनुदानित सिलिंडरच्या किंमतीमध्ये प्रत्येक महिन्याला २ रुपयांची वाढ करण्याच्या सूचना केल्या होत्या. आता घरगुती वापराच्या अनुदानित सिलिंडरच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.

घरगुती वापराच्या सिलिंडरवरील अनुदान हळूहळू संपवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे दर महिन्याला अनुदानित सिलिंडरच्या किमतीत ४ रुपयांची वाढ करुन अनुदान संपुष्टात आणले जाईल, असे प्रधान यांनी सांगितले. सध्या प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी १२ सिलिंडर अनुदानित दरांमध्ये मिळतात. यानंतरचे सिलिंडर ग्राहकांना बाजार भावानुसार खरेदी करावे लागतात.

देशातील अनुदानित दरांमध्ये सिलिंडर खरेदी करणाऱ्यांची संख्या १८.११ कोटी इतकी आहे. अनुदानित दरातील सिलिंडर न वापरता बाजारभावानुसार सिलिंडर खरेदी करणाऱ्यांची संख्या २.६६ कोटी इतकी आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाची झळ सामान्य नागरिकांना सर्वाधिक बसणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या