मुंबई बाजार समिती अदानींच्या घशात जाणार; सरकारचा डाव, प्रवीणकुमार नहाटा यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याच्या नावाखाली त्यांचे संपूर्ण खासगीकरण करून, त्या अदानी-अंबानींसारख्या बड्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव राज्य सरकारने आखला आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे सभापती प्रविणकुमार नहाटा यांनी पत्रकार परिषदेत केला. मुंबई बाजार समिती अदानीला चालवायला देण्याची छुपी तयारी सुरू असून, या सरकारी धोरणामुळे शेतकरी बाजार समित्यांमधून कायमचा हद्दपार होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

राज्यातील बाजार समित्यांच्या विविध प्रश्नांबाबत विशेषतः मुंबई नागपूर बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून राष्ट्रीय बाजार समिती घोषित केल्या प्रकरणी बाजार समिती संघाच्या वतीने सोमवारी राज्यातील बाजार समित्यांच्या सभापतींची बैठक पुण्यात पार पडली. याप्रसंगी उपसभापती संतोष सोमकंशी, ज्येष्ठ संचालक माजी आमदार केशवराव मानकर, नाना नागमोते, दामोदर नवपुते, कार्यकारी संचालक किशोर कुलकर्णी, लेखापाल कादंबरी पासलकर आदी उपस्थित होते.

आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास प्रसंगी राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

मंत्रालयापर्यंत लाच द्यावी लागते; भाजपच्याच माजी आमदारांचा घरचा आहेर!

बाजार समित्यांच्या विकासकामांना मंजुरी मिळवण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांपासून थेट मंत्रालयापर्यंत कोट्यवधी रुपयांची लाच द्यावी लागते, असा खळबळजनक आरोप भाजपचे माजी आमदार आणि गोंदिया जिल्ह्यातील आमगाव बाजार समितीचे सभापती केशवराव मानकर यांनी केला.