
सातारा-लोणंद राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव तालुक्यातील देऊर येथे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ब्रिटिशकालीन शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था झाली असून, हे विश्रामगृह सध्या सार्वजनिक शौचालय म्हणून वापरात येत आहे.
देऊर गावातील शाळा, ग्रामपंचायतजवळ जवळपास दोन ते अडीच एकर क्षेत्रात हे विश्रामगृह बांधण्यात आले आहे. नागपूरचे संस्थापक आणि देऊर गावचे राजे रघुजीराजे भोसले यांच्या काळापासून ते कोरेगावच्या माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांच्या कालावधीपर्यंत हे विश्रामगृह वापरात होते. मात्र, त्यानंतर याची दुरवस्था झाली आहे.
या विश्रामगृहात यापूर्वी कोरेगावच्या आमदारांनी आमसभा, पाणी परिषदा घेतल्या होत्या. उत्तर कोरेगाव तालुक्यातील गावातील अनेक महत्त्वाच्या चर्चा या ठिकाणी होत होत्या. कोरेगाव तालुक्यातील देऊर गाव हे फलटण मतदारसंघ आणि कोरेगाव यांना जोडणारे आहे. त्यामुळे हे विश्रामगृह सुरू राहणे गरजेचे आहे. यासाठी गेली 20 वर्षे येथील ग्रामस्थ पाठपुरावा करत आहेत. मात्र, ते चालू होण्याबाबत लोकप्रतिनिधी सतत वेगवेगळी उत्तरे देत आहेत.