ऑक्सिजनवरून विरोधकांनी सरकारचे नाक दाबले! गडकरींचा व्हिडीओ व्हायरल

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मेडिकल ऑक्सिजनच्या तुटवडय़ामुळे देशात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, असा अजब दावा करणाऱ्या केंद्र सरकारविरुद्ध देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आज विरोधकांनी सरकारच्या असंवेदनशीलतेवर जोरदार हल्लाबोल करीत नाक दाबले. काँग्रेसने राज्यसभेत चुकीची माहिती दिल्यामुळे हक्कभंग प्रस्ताव आणण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी ‘कोविडच्या काळात आपल्या देशातील अनेक लोकांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपला जीव गमवावा लागला’, असे वक्तव्य केले होते. गडकरींचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात हाहाकार माजला. ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा झाला. अनेक रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. गंगेत शेकडो प्रेते तरंगताना अवघ्या जगाने पाहिले. हे विदारक चित्र असताना मंगळवारी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नावर लेखी उत्तर देताना आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार  यांनी ऑक्सिजन तुटवडय़ामुळे देशात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असे धक्कादायक विधान केले. आरोग्य हा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा विषय आहे, असे सांगून भाजपने आणि केंद्र सरकारने हात झटकले. यावर  विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

संवेदनशीलता आणि सत्याचा अभाव राहुल गांधी

केवळ ऑक्सिजन अभाव नाही तर, या सरकारमध्ये संवेदनशीलता आणि सत्याचाही अभाव आहे. यापूर्वीही ही कमतरता होती आणि आताही आहे, असे ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.

हक्कभंग आणणार वेणुगोपाल

आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी चुकीची माहिती देऊन संसदेची दिशाभूल केली आहे. त्यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणणार, अशी माहिती काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.

कोरोना महामारीच्या वर्षात केंद्र सरकारने ऑक्सिजन निर्यात 700 टक्क्यांनी वाढविली यामुळे देशात रुग्णांचे मृत्यू झाले. सरकारने ऑक्सिजन पुरवठय़ासाठी टँकरची व्यवस्था केली नाह़ी एम्पावर्ड ग्रुप आणि संसदीय समितीचा सल्ला ऐकला नाही. रुग्णालयात ऑक्सिजन प्लाण्ट लावण्यासाठी तयारी केली नाही. यामुळे लोक मृत्युमुखी पडले.

– प्रियंका गांधी-वढेरा  (काँग्रेस सरचिटणीस)

सरकारवर खटला दाखल केला पाहिजे संजय राऊत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पावले, जे ऑक्सिजनसाठी सिलिंडर्स घेऊन धावत होते, त्यांचा सरकारच्या दाव्यावर विश्वास बसतो का? हे सांगायला हवे. ऑक्सिजनअभावी अनेक राज्यांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. उत्तर लेखी असो पिंवा मौखिक, सरकार सत्यापासून पळत आहे. बहुतेक सरकारवर हा पेगॅससचा परिणाम आहे, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.

या सरकारवर कोण विश्वास ठेवणार? त्यांच्या ‘डीएनए’मध्येच नाही. जनतेच्या भावना आणि समस्या सरकार समजून घेत नाही. या सरकारने पाहणे आणि ऐकणे बंद केले आहे.

– कपिल सिब्बल (काँग्रेस नेते)

सरकार म्हणते ऑक्सिजन तुटवडय़ामुळे मृत्यू झाला नाही. ठीक आहे… म्हणजे जे मृत्यू झाले त्या सर्वांनी आत्महत्या केली.

– तेजस्वी यादव (राजद अध्यक्ष)

दिल्लीसह देशभरात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे ऑक्सिजनअभावी मृत्यू नाही, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.

– सत्येंद्र जैन (आरोग्यमंत्री, दिल्ली)

गडकरी काय म्हणाले होते?

काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला, असे म्हटले होते. गडकरी यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून केंद्र सरकारवर संताप व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या