एअर इंडिया, बीपीसीएल मार्चपूर्वीच विकून टाकणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

1071

मंदीच्या तडाख्याने भरकटलेल्या अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी सरकारने एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल) या कंपन्या मार्चपूर्वीच विकून टाकण्याचा निर्धार केला आहे. या व्यवहारातून एक लाख कोटींहून अधिक रुपयांचा निधी उभा करण्याची सरकारची योजना आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली.

कोटय़वधीच्या कर्जाच्या बोझ्याखाली दबलेली एअर इंडिया ही सरकारी विमान कंपनी विकण्यासाठी मागील वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहेत, मात्र गुंतवणूकदारांनी निरुत्साह दाखवला. या विक्री प्रक्रियेला वेग देऊन चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी म्हणजे मार्चपूर्वीच एअर इंडियाच्या विक्रीचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्धार सरकारने केला आहे. एअर इंडियाला गेल्या आर्थिक वर्षात जवळपास 4600 कोटींच्या तोटय़ाची झळ बसली. तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि विदेशी चलनाचे नुकसान यामुळे एअर इंडियाचे चाक तोटय़ाच्या खड्डय़ात आणखी रुतले गेले. बीपीसीएलचीही हीच गत असल्यामुळे दोन्ही सरकारी कंपन्या चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच विकून टाकण्याचे सरकारने ठरवले आहे, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी मुलाखतीत स्पष्ट केले.

सणासुदीत बँकांनी दिले 1.81 लाख कोटींचे कर्ज
सणासुदीच्या दिवसांत बँकांनी 1.81 लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटले. यावरून लोकांची मानसिकता बदलल्याचे दिसते. जर ग्राहकांची आर्थिक स्थिती चांगली नसती तर त्यांनी बँकांकडून कर्ज घेण्याचा विचार का केला असता, असा सवाल अर्थमंत्री सीतारामन यांनी यावेळी उपस्थित केला.

यंदा अपेक्षेएवढी कर वसुली झाली आहे. त्यामुळे निर्गुंतवणूक आणि स्ट्रटेजिक सेलमधून महसूल गोळा करण्याचा सरकारचा विचार आहे. काही क्षेत्रे आता मंदीतून बाहेर पडताहेत. त्यामुळे जीएसटी वसुली वाढण्याची आशा बाळगलीय. – निर्मला सीतारामन, अर्थमंत्री

आपली प्रतिक्रिया द्या