पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सरकारने तो परत घेऊ नये; साहित्य संमेलनात मांडला ठराव

>> शिल्पा सुर्वे

‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाला मिळालेला पुरस्कार सरकारने नुकताच रद्द केला. त्यानंतर साहित्य वर्तुळातून मोठा संताप व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर 96व्या मराठी साहित्य संमेलनात ठराव करण्यात आला. पुरस्कार जाहीर केल्यानंतर सरकारने तो परत घेऊ नये, अशी मागणी ठरावाच्या माध्यमातून करण्यात आली. पुरस्कार निवड समितीच्या सदस्यांनी पुरस्कारासाठी मराठी ग्रंथांची निवड करताना ते ग्रंथ व्यवस्थित वाचूनच निर्णय घ्यावा आणि दिलेला पुरस्कार परत घेऊ नये, अशी मागणी केली. त्याला डॉ. मिलिंद जोशी सूचक तर किरण सगर अनुमोदक होते.

तसेच कोणत्याही कारणाने राज्यातील अनुवादित आणि अनुवादित मराठी आणि सेमी इंग्रजी शाळांचे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये रुपांतर केले जाणार नाही, यासाठी विधिमंडळात कायदा करण्यात यावा, अशी मागणी ठरावाद्वारे करण्यात आली. या ठरावाचे विलास मानेकर सूचक तर प्रकाश पायगुडे अनुवादक आहेत.

तीन दिवसांच्या साहित्य जागराची सांगता

गेल्या तीन दिवसांपासून ऐतिहासिक वर्धानगरीत सुरू असलेल्या साहित्यवारीची आज सांगता झाली. महात्मा गांधी आणि विनोबांच्या स्पर्शाने पावन झालेल्या वर्धानगरीने संमेलनाच्या मांडवाखाली, साहित्यिक आणि साहित्यप्रेमींच्या साक्षीने या दोन्ही महनीय व्यक्तींचे स्मरण केले.

संमेलनाचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.  राजकीय नेत्यांना संमेलनाच्या व्यासपीठावर बोलवायचे की नाही, यावर नेहमी चर्चा होते. मतभेद असू शकतात मनभेद नको. साहित्यिकांचा अधिकार राजकारण्यांनी मान्य केला पाहिजे, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले. भविष्याची जीवनदृष्टी देण्याची ताकद साहित्यिकांत आणि साहित्यात आहे. पुस्तके प्रकाशित झाली पाहिजेत. पण काळाच्या ओघात नवीन पिढीसाठी डिजिटल पुस्तके निघाली तर आपल्याला जो विचार मांडायचा आहे, तो तरुण पिढीपर्यंत आपण पोहोचवू शकतो. भविष्यात साहित्य, काव्य सादरीकरणाच्या पद्धतीत अनेक बदल होणार असून ज्ञानेश्वरी, ग्रामगीता, गजानन महाराजांची पोथी डिजिटल करण्याचे काम सुरू आहे,  असे गडकरी म्हणाले.

मतभेदाच्या भिंती वितळू द्या – नरेंद्र चपळगावकर

समारोपातील भाषणात संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती (निवृत) नरेंद्र चपळगांवकर यांनी मतभेदाच्या या भिंती वितळू द्या. साहित्याची निर्मळ गंगा वाहत असताना नव्या पिढीला पाहू द्या, असा आशावाद व्यक्त केला.

नव्या प्रतिभेचे हुंकार आपण मोकळ्या मनाने करतो, ते करण्याची जागा म्हणजे साहित्य संमेलन. विनोबा सर्वात मोठे साहित्यिक. पण आपण कधी विनोबा, नानासाहेब गोरे यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष केले नाही. त्यांचे मोठेपण जाणले नाही. माणसांतील या भिंती वाढत आहेत, त्या तोडूया, असे चपळगावकर म्हणाले. मतभेद असले तरी विचारांची आदानप्रदानता थांबता कामा नये. सर्वांनी अशी उदारता शिकली पाहिजे, असे चपळगावकर म्हणाले.

संमेलनासाठी चार निमंत्रणे

97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी चार ठिकाणची निमंत्रणे साहित्य महामंडळाला प्राप्त झाली आहेत. त्यात अमळनेर, जालना, सातारा आणि औंदुबर (सांगली) या चार ठिकाणचा समावेश आहे.

विदर्भ साहित्य संघाला 10 कोटी रुपये

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शासनाकडून 10 कोटींचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मराठी ही ज्ञानभाषा असली तरी त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकलो नाही आणि नव्या पिढीचा ओढा मराठीकडे कमी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नव्या शिक्षण धोरणात वैद्यकीय, तंत्र आणि सर्व प्रकारचे शिक्षण मराठीतून देऊ शकणार आहोत. ज्ञान व्यवहारात मराठीचा समावेश होईल आणि सर्व चिंता दूर होतील, असा आशावाद फडणवीस यांनी व्यक्त केला.