एकनाथ खडसे यांच्या सुरक्षेवर दिवसाला ४२ हजार रुपये खर्च

39

सामना ऑनलाईन । मुंबई

जमीन घोटाळ्यावरून राजीनामा द्यावा लागलेले भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सुरक्षेवर दिवसाला तब्बल ४२ हजार रुपयांचा खर्च होत असल्याचे समोर आले आहे. खडसे यांच्या सुरक्षेसाठी एक मुख्य हवालदार, अन्य तीन हवालदार, एक वाहनचालक, विशेष सुरक्षा दलाचे (एसपीजी) दोन कमांडो यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. या सर्वांचा दिवसाचा खर्च ४२ हजार रुपये होत आहे. त्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या व घोटाळ्यांच्या आरोपात अडकलेल्या नेत्यावर एवढी उधळपट्टी कशाला, असा सवाल केला जात आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसेंची सुरक्षा कमी करण्याची मागणी केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते गजानन मालपुरे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत खडसेंच्या सुरक्षेवर होणाऱ्या खर्चाची माहिती मागवली होती. सुरुवातीला जळगाव पोलिसांनी हा सुरक्षेचा आणि खासगी प्रश्न असल्याचे सांगत याबाबत माहिती देण्यास नकार दिला होता. मात्र मालपुरे यांनी पुन्हा एकदा जळगावच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून याबाबत माहिती देण्यास सांगितले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, खडसे यांच्या सुरक्षेवर दिवसाला ४२ हजार रुपये खर्च होतो. खडसे यांनी ३ जून २०१६ रोजी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. ३ जून पासून गेल्या २० महिन्यात त्यांच्या सुरक्षेवर २.५५ कोटींचा खर्च झाला आहे.

“एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नसल्याचे सरकार सांगत आहे, तर दुसरीकडे घोटाळ्यांमुळे राजीनामा द्यावा लागलेल्या माजी मंत्र्याच्या सुरक्षेवर कोट्यवधी रुपये खर्च करते आहे. सरकारने एकतर खडसेंना दिलेली सुरक्षा कमी करावी किंवा त्यांच्या सुरक्षेचा खर्च त्यांना स्वत:ला भरायला लावावा, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या