सरकारने ओतले महागाईच्या आगीत पेट्रोल, ३८ रुपयांच्या पेट्रोलसाठी ४० रुपये टॅक्स

33

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सरकारकडून ३८ रुपयांच्या पेट्रोलसाठी तब्बल ४० रुपये टॅक्सवसुली केली जात आहे, तर ४१ रुपयांच्या डिझेलवर २८ रुपये टॅक्स वसूल केला जात आहे. या टॅक्समुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर अक्षरशŠ गगनाला भिडले आहेत. मुंबईत पेट्रोलने पंच्याऐंशी पार केली आहे, तर दिल्लीत पेट्रोल ८० रुपये प्रतिलिटरपर्यंत गेले आहे.

सलग तेराव्या दिवशी पेट्रेल, डिझेलची दरवाढ झाली आहे. पेट्रोल १७ पैसे, तर डिझेल १६ पैशांनी महागले.

जीएसटी लावल्यास किंमत घटणार
सरकारने पेट्रोल आणि डिझेल जर जीएसटीच्या कक्षेत आणले तर इंधनाच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे, परंतु त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारला नुकसान होण्याची शक्यता आहे. ७८ रुपये प्रतिलिटर पेट्रोलचे दर जकात कर आणि व्हॅट हटवल्यास ४२ रुपये प्रतिलिटरपर्यंत घसरतील. तसेच जर जास्तीत जास्त २८ टक्के दर जीएसटीसी जोडले तर पेट्रोलचे दर ५३.५० प्रतिलिटर होतील म्हणजेच सध्याच्या दरांपेक्षा पेट्रोल २४ रुपयांनी स्वस्त होईल असा अंदाज आहे.

– नवी दिल्लीत ३८ रुपये लिटर पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकारांकडून तब्बल ४० रुपये टॅक्स वसूल करण्यात येत आहे. यात केंद्राकडून आकारला जाणारा १९.४८ रुपये जकात कर आहे. याशिवाय डीलरचे ३.६३ रुपये कमिशन आणि राज्य सरकारकडून आकारण्यात येणारा १६.५५ रुपयांच्या व्हॅटचाही समावेश आहे.

– ४०.७८ रुपये प्रतिलिटर डिझेलवर २८ रुपये टॅक्सवसुली करण्यात येत आहे. यात केंद्र सरकारकडून आकारण्यात येणारा १५.३३ रुपयांचा जकात कर, डीलरचे २.५३ रुपये कमिशन, राज्य सरकारकडून आकारण्यात येणारा १०.११ रुपये व्हॅट यांचा समावेश आहे. त्यामुळे डिझेलची किंमत ६९ रुपयांपर्यंत पोहोचत आहे.

यूपीएच्या काळात तीन वर्षे पेट्रोल, डिझेलच्या याच किमती होत्या, शहांचे ‘अर्थशास्त्र’
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने जनता प्रचंड त्रस्त असताना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पूर्वीच्या यूपीए सरकारकडे बोट दाखविले आहे. ‘यूपीए’च्या काळात तीन वर्षे पेट्रोल, डिझेलच्या किमती आता सारख्याच होत्या. तीन दिवसांतच ते वैतागले आहे असे शहा म्हणाले. दरम्यान इंधन दरवाढीचे हे ‘अर्थशास्त्र’ मांडताना शहा यांनी यूपीएच्या काळात कच्चे तेल १२० डॉलरवर गेले होते आणि गेल्या चार वर्षांत १०० डॉलर्स प्रतिबॅरलच्या आतच कच्चे तेल आहे. हे मात्र सोईस्करपणे सांगितले नाही अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या