राज्यपालांच्या विधानावर वाद घालण्याची वेळ नाही; शेतकऱ्यांकडे लक्ष द्या!

राज्यपालांच्या एखाद्या विधानावर वाद घालण्याची ही वेळ नाही. सध्या शेतकऱ्यांकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे. सरकार त्यांना काय मदत करणार हे स्पष्टपणे सांगावे, टोलवाटोलवी नको आहे, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.

पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शरद पवार फक्त सरकारचा बचाव करण्याचे काम करतात. ते कृषीमंत्री होते. त्यांना केंद्राकडून कशी मदत मिळते हे माहीत आहे. तरीही प्रत्येक गोष्ट ते केंद्रावर टोलवत आहेत, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

परतीच्या पावसामुळे शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत सरकारने थेट मदत केली पाहिजे अशी मागणी करतानाच फडणवीस म्हणाले, दीड महिन्यांनी मदत देऊ, दोन महिन्यांत मदत देऊ असे सरकारने करू नये. तत्काळ मदत मिळाली नाही तर शेतकरी पुढेदेखील उभा राहू शकणार नाही. केंद्र सरकार मदत देईलच, पण प्राथमिक जबाबदारी राज्याची आहे. राज्य सरकार मात्र हात झटकून राहिले आहे, असे फडणवीस म्हणाले.

नुकसानीसाठी मोबाईलमध्ये काढलेला फोटो ग्राह्य धरत प्रत्येकाला मदत मिळेल यासाठी आम्ही आग्रही राहू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्राने जास्त मदत द्यावी

केंद्राला जास्त महसूल देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे या संकटकाळात केंद्र सरकारने जास्तीत जास्त मदत करायला हवी, असे सांगतानाच फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका अशोभनीय असल्याचा पलटवार शिवसेनेचे प्रवक्ते सुनील प्रभू यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पालकमंत्री आणि सत्ताधारी आमदार शेतकऱयांच्या बांधावर जात आहेत. सरकार मदतीचे काम चोख बजावणार आहे. त्यामुळे विरोधकांनी उगाच आरोपांची गरळ ओकू नये, असेही प्रभू यांनी म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या