यंदाची दहीहंडी पूरग्रस्तांसाठी, गोविंदा पथकेही बक्षिसाची रक्कम मदत म्हणून देणार

286
dahihandi

पूरस्थितीच्या भीषण अनुभवातून कोल्हापूर, सांगली व अन्य जिल्हे आता सावरत आहेत. अजूनही त्यांना मदतीची आवश्यकता आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी अनेक राजकीय दहीहंडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. नामवंत गोविंदा पथकेही त्यांना मिळणाऱया बक्षिसांची रक्कम पूरग्रस्तांसाठी देऊन सामाजिक बांधिलकी जपणार आहेत.

गोपाळकाल्याच्या दिवशी मुंबईत दरवर्षी विविध संस्था, राजकीय पक्ष आणि पदाधिकाऱयांच्या वतीने हजारो दहीहंडय़ा उभारल्या जातात. त्या फोडण्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे लावली जातात. काही प्रमुख दहीहंडय़ांचा खर्च तर कोटींच्या घरात असतो. तिथे दहीहंडीबरोबरच मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवून सेलिब्रिटींना बोलवले जाते. या वर्षी त्यावर खर्च न करता साध्या व पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करून पूरग्रस्तांना मदत करण्याची घोषणा आयोजकांनी केली आहे. गिरगाव, दादर, कुर्ला या भागांतील हंडय़ांचा त्यात समावेश आहे.

नवी मुंबईत भव्यदिव्यतेला फाटा…
कळंबोली येथे रामदास शेवाळे प्रतिष्ठान व नवीन पनवेल येथे रामशेठ ठाकूर विचार मंच यांच्या दहीहंडय़ा या भव्यदिव्य म्हणून ओळखल्या जातात. परंतु यंदा त्या भव्यदिव्यतेला फाटा देऊन केवळ परंपरा जपण्याचा प्रयत्न छोटी हंडी उभारून केला जाणार आहे आणि वाचलेली रक्कम पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देण्यात येईल असे आयोजकांनी सांगितले.

ठाण्यातही पूरग्रस्तांच्या मदतीचा संकल्प
ठाणे येथे टेंभी नाका, वर्तकनगरमध्ये संस्कृती प्रतिष्ठान, रघुनाथ नगरमध्ये संकल्प प्रतिष्ठान, हिरानंदानी मेडोजमध्ये समर्थ प्रतिष्ठान या दहीहंडय़ा गोविंदा पथकांमध्ये मानाच्या म्हणून ओळखल्या जातात. त्या फोडण्यासाठी मोठय़ा मंडळांमध्ये चढाओढ लागते. परंतु यंदा या हंडय़ांच्या आयोजकांनीही पूरग्रस्तांच्या मदतीचा संकल्प केला आहे. दहीहंडीच्या बक्षिसाची रक्कम आणि कलाकारांच्या मानधनाला कात्री लावून तो निधी कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना दिला जाणार आहे.

मुंबईतील या दहीहंड्या रद्द…
– वरळी येथील सचिन अहिर यांची दहीहंडी
– घाटकोपर येथील राम कदम यांची दहीहंडी
– दहिसर येथील प्रकाश सुर्वे यांची दहीहंडी

आयडियलची पर्यावरणपूरक दहीहंडी
आयडियल बुक कंपनी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथे पर्यावरणपूरक सेलिब्रेटी दहीहंडीचे आयोजन केले आहे. पुरूष गोविंदा पथकाच्या दहीहंडीचे 42 वे तर महिला पथकाचे यंदाचे 26 वे वर्ष आहे. प्रदूषण विरोधी पथनाटय़ सादर करून यावेळी पर्यावरणपूरक सामाजिक संदेश दिला जाणार आहे.

यंदाही या दहीहंडीत मराठी चित्रपट आणि मालिकेतील कलाकारांची मांदियाळी असणार आहे. मधुरा वेलणकर, सीमा देशमुख, सुलेखा तळवलकर, सोनल पवार, दीप्ती धोतरे, शिल्पा तुळसकर, फिरोज खान, तुषार दळवी, श्रीरंग देशमुख हे कलाकार सहभागी होणार असून स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आयडियलच्या मंदार नेरूरकर यांनी दिली. यावेळी पूरग्रस्तांसाठी 50 हजार रुपयांच्या शैक्षणिक साहित्याची मदत दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दहीहंडीनिमित्त शाळांना सुट्टी
दहीहंडीनिमित्त उद्या 24 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे व पुणे येथील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने सुट्टीविषयीचे परिपत्रक जारी केले असून शिक्षणमंत्री ऍड. आशीष शेलार यांनीही ट्विट करून सुट्टीविषयीची माहिती दिली. शाळांसह महाविद्यालयेही उद्या बंद राहणार आहेत. मुंबईतील अनेक कॉन्व्हेंट शाळांनी दहीहंडीची सुट्टी जाहीर केली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागणार होते. शिक्षणमंत्र्यांनी शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱयांना दिले असले तरी उद्या शनिवार शासकीय कामकाज नसल्याने जिल्हाधिकाऱयांनीही सुट्टी दिली नसल्याने शालेय शिक्षण विभागातर्फे शाळांना दहीहंडीची सुट्टी देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या