होळीपूर्वीच बँकेची कामे आटपून घ्या! सहा दिवस बँक बंद राहणार

1716

बँकेत महत्त्वाचं काम किंवा व्यवहार करायचे असतील तर शक्यतो होळीपूर्वीच आटपावे लागणार आहेत. कारण, होळीनंतर तब्बल सहा दिवस अनेक बँक बंद राहणार आहेत.

पुढच्या म्हणजे मार्च महिन्यात नऊ तारखेला होळी पौर्णिमा आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 मार्च रोजी धुलिवंदनाची सुट्टी असणार आहे. त्यानंतर बँकेच्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे 11 मार्च ते 13 मार्च असे तीन दिवस बँकांची कामं बंद राहतील. त्यानंतर 14 मार्च रोजी दुसरा शनिवार आणि 15 रोजी रविवार असल्याने बँक बंद असेल. त्यामुळे 10 ते 15 असे सहा दिवस बँक बंद राहणार आहे.

या काळात बँकेच्या माध्यमातून होणारे इलेक्ट्रॉनिक व्यवहार बंद असतील आणि एटीएममध्येही रोख रकमेचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महत्त्वाचे आर्थिक व्यवहार होळीपूर्वीच आटोपून घ्यावे लागणार आहेत. अर्थात हे सहा दिवस बंद असणाऱ्या बँक या सरकारी बँक असतील. पण, ज्यांचे खासगी बँकांमध्ये खाते आहे, त्या बँक मात्र फक्त 10 मार्च, 14 मार्च आणि 15 मार्च या तीनच दिवशी शासकीय सुट्ट्यांमुळे बंद असतील. उर्वरित दिवशी त्यांचे व्यवहार नियमितपणे सुरू असतील.

सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची दर पाच वर्षांनी पगारवाढ होत असते. मात्र, 2012नंतर सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात आलेली नाही. त्याविरोधात बँक कर्मचारी संघटनांनी 11 मार्च ते 13 मार्च या दरम्यान संपाची हाक दिली आहे. जर मार्च अखेरपर्यंत जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 1 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा बँक कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या