पुढील स्थानक एलफिन्स्टन नाही तर ‘प्रभादेवी, शिवसेनेच्या प्रयत्नांना यश

17

सामना ऑनलाईन । मुंबई

पुढील स्थानक ‘एलफिन्स्टन’ नाही तर ‘प्रभादेवी’ आणि सीएसटी नाही तर ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’. मुंबईमधील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची मागणी शिवसेनेने अनेकवेळा केली होती. आता या मागणीला केंद्राकडून हिरवा कंदिल मिळाला आहे. केंद्र सरकारने दोन स्थानकांच्या नावात बदल करण्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील एलफिन्स्टन रोड स्थानकाचे नाव प्रभादेवी, तर सीएसटी स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे असणार आहे.

सीएसटीचे ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’, एलफिन्स्टनचे ‘प्रभादेवी’, शिवसेनेच्या प्रयत्नांना यश

शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खासदारांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. केंद्र शासनाने गृहविभागाने रेल्वे स्थानकांची नावे बदल करण्यास मान्यता दिली आहे. राज्य शासनाने या दोन्ही स्थानकांची सुधारीत नावे इंग्रजी व देवनागरी लिपीत राजपत्रात प्रसिद्ध करुन त्याप्रमाणे नावांमध्ये बदल करण्याची सूचना केंद्राने राज्याला केली आहे.

एल्फिस्टन रोड हे नाव लॉर्ड एलफिन्स्टन यांच्या नावावरून देण्यात आले होते. ते १८५३ ते १८६० या काळात ‘गव्हर्नर ऑफ बॉम्बे’ होते. या स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत होती. मार्च १९९६ मध्ये व्हिक्टोरिया टर्मिनस हे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ असे करण्यात आलं होतं. त्यानंतर २० वर्षांनी पुन्हा या स्थानकाचे नाव बदलणार असून आता ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असे नामकरण करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या