आर्थिक मंदीवर सरकार योग्य ती पावले उचलेल, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत

881

काही क्षेत्रांतील आर्थिक मंदी, वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारी यांसारख्या प्रश्नांवर केंद्र सरकार योग्य ती पावले उचलत आहे. मंदीबाबत संबंधित विभागांशी चर्चा सुरू असून येत्या पंधरा दिवसांत सरकारकडून यावर निश्चितपणे कार्यवाही होईल, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी दिली.

इंडस्ट्री अॅकॅडमिया सहयोग समिती आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित इंडकॉन (इंडस्ट्री अॅकॅडमिया कॉन्क्लेव्ह) परिषदेचे उद्घाटन सावंत यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ब्लू स्टारचे अध्यक्ष शैलेश हरिभक्ती, न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स प्रा. लि.चे अध्यक्ष नानिक रूपानी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. एस. परशुरामन, प्र-कुलगुरू डॉ. श्रीहरी होनवाड उपस्थित होते.

सावंत म्हणाले, आर्थिक मंदीबाबत अर्थमंत्री, नीती आयोगाचे अध्यक्ष, अर्थ सचिव, महसूल विभागाचे सचिव, उद्योजक, काही संस्थांच्या प्रतिनिधींची नुकतीच बैठक झाली. मीही या बैठकीस उपस्थित होतो. काही घटकांनी आर्थिक मंदीबाबत सूचना केल्या. यावर सरकार निश्चितपणे पावले उचलेल. नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी आर्थिक मंदी मान्य केली असली तरी त्यावर उपाय शोधले जात आहेत.

सावंत म्हणाले, ‘स्मार्ट सिटी’साठी पाणी, वीज आणि परिवहनाची योग्य सुविधा प्रत्येकाला मिळायला हवी. त्यासाठी औद्योगिक क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थांबरोबरच सर्वांनी ही जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. औद्योगिक क्षेत्रात रोबोटायजेशन आल्याने प्रत्येक कार्य रोबोटमार्फत केले जात आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे येणाऱ्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर देशात होईल. परंतु त्याही पुढील 20 ते 25 वर्षांत हायड्रोजनवर वाहने चालतील. बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे उद्योगधंद्यांनी बदलणे गरजेचे आहे. यावेळी राहुल कराड, शैलेश हरिभक्ती, नानीक रूपानी यांचीही भाषणे झाली. प्रा. डॉ. प्रसाद खांडेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या