केंद्राच्या हुकूमशाहीला उत्तर द्यायलाच हवे – पवार

417

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) घटना योग्य नव्हती. जेएनयूतील हिंसाचाराचा देशभरात निषेध होत आहे. हिंसाचाराच्या माध्यमातून केंद्र सरकार हुकूमशाहीची नीती वापरत असून सरकारच्या या हुकूमशाहीला महात्मा गांधीजींच्या अहिंसेने उत्तर देऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज म्हणाले.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी महात्मा गांधी शांती यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेला गेट वे ऑफ इंडियापासून सुरुवात झाली. या वेळी शरद पवार उपस्थित होते. यानिमित्ताने बोलताना शरद पवार यांनी भाजपवर टीका केली. केंद्र सरकारचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या निर्णयामुळे देशातील जनतेत भीतीचे वातावरण आहे. नागरिकत्व सिद्ध करणारी कागदपत्रे नसतील, सरकारने बांधलेल्या संक्रमण शिबिरात राहावे लागेल, अशी भीती लोकांमध्ये आहे. समाजात या कायद्यावरून नाराजी आहे. याविरोधात तरुण पिढी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे, मात्र ही आंदोलने चिरडण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका पवार यांनी केली. देशात निर्माण झालेली परिस्थिती बदलायची असेल तर गांधीजींचा सत्याग्रहाचा मार्ग योग्य आहे, असे शरद पवार म्हणाले. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही उपस्थित होते. ते म्हणाले की, यशवंत सिन्हा यांनी काढलेल्या गांधी यात्रेचे कौतुक केले पाहिजे. सरकार आपले म्हणणे ऐकून घेईल असे नाही. आपण संविधानासाठी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या अजेंडय़ासाठी लढत आहे. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री शशिकांत शिंदे, राज्यसभेचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या