टॅक्सी-रिक्षात जीपीएस यंत्रणा सक्तीची; चालकांच्या मनमानीला चाप – गृह राज्यमंत्री

12

सामना प्रतिनिधी । मुंबई

प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत रिक्षा व टॅक्सीचालकांच्या अरेरावीला आळा घालण्यासाठी ऑटोरिक्षा व टॅक्सीमध्ये जीपीएस प्रणाली बसविणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत केली. मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये टॅक्सी तसेच रिक्षाचालकांच्या मनमानीला प्रवाशांना सामोरे जावे लागते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी तसेच चालकांवर अंकुश ठेवण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली. या चर्चेला उत्तर देताना गृहराज्यमंत्र्यांनी वरील घोषणा केली.

टॅक्सीवर नजर ठेवण्यासाठी ओला-उबेरप्रमाणे जीपीएस यंत्रणा लावणे अनिवार्य करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे रिक्षावाहतुकीसाठी ‘मागेल त्याला परवाना’ योजना राबविणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. नौपाडा पोलीस ठाण्यामधील घटनेनंतर पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली असून ७ हजार २१२ ऑटोरिक्षा तपासण्यात आल्या आहेत. यापैकी १०४ ऑटोरिक्षांचा परवाना निलंबित केला असून १०८ रिक्षाचालकांचे परमीट निलंबित केले आहे. २०१६-१७ या वर्षी एकट्य़ा ठाण्यामधून २७ हजार वाहने दोषी आढळली तर ३५३ जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, तर ५५५ चालकांकडे परवाने नसल्याचे आढळले. या मोहिमेद्वारे ३ कोटी ४७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या