‘ऑस्ट्रेलियाला विसरा, आता टीम इंडियाला…’, स्वानचा इंग्लंडच्या संघाला इशारा

ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमित पराभवाची धुळ चारून आलेल्या हिंदुस्थानला आता घरच्या मैदानावर इंग्लंडच्या संघाचा सामना करायचा आहे. पुढील महिन्यात इंग्लंडचा संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार आहे. 5 फेब्रुवारीपासून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार असून त्यानंतर दोन्ही संघ पाच टी-20 आणि 3 एक दिवसीय सामने खेळतील.

प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडियाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला ज्याप्रकारे पराभूत केले ते पाहून इंग्लंडचा संघ हादरला आहे. इंग्लंडचा माजी खेळाडू ग्रॅम स्वानच्या बोलण्यावरून ते स्पष्ट होत आहे. स्वानने ऑस्ट्रेलियाला विसरून आता टीम इंडियावर लक्ष्य केंद्रीत करा, असा इशारा इंग्लंडच्या संघाला दिला आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्वीप्रमाणे सर्वश्रेष्ठ राहिलेला नाही त्यामुळे त्यांच्यावर लक्ष्य केंद्रीत करण्याऐवजी इंग्लंडने आता हिंदुस्थानला हिंदुस्थानमध्ये कसे पराभूत करता येईल यावर विचार करायला हवा, असे स्वान म्हणाला. इंग्लंडने हिंदुस्थानला त्यांच्याच मायदेशात पराभूत केल्यास संघासाठी ही मोठी उपलब्धी असेल, असेही स्वान म्हणाला.

इंग्लंडच्या हिंदुस्थान दौऱ्यापूर्वी स्वानने इंग्रजी वृत्तपत्र ‘द सन’ बोलताना म्हटले की, इंग्लंडचा संघ नेहमीच अॅशेस सिरीजबाबत विचार करतो. मात्र आता ते सोडा. तुम्हाला जर जगातील सर्वोत्कृष्ठ संघ बनायचा असेल तर बना, पण फक्त ऑस्ट्रेलियालाच पराभूत करण्याचा विचार करू नका. आता ऑस्ट्रेलिया पूर्वीप्रमाणे सर्वोत्कृष्ठ संघ राहिलेला नाही. आपल्याला अॅशेसच्या पुढचा विचार करावा लागेल. आता हिंदुस्थानला हिंदुस्थानमध्ये पराभूत करणे मोठी उपलब्धी असेल, कारण 2012 पासून हिंदुस्थानचा संघ मायदेशात अजय आहे, असेही स्वान म्हणाला.

2012 मध्ये इंग्लंडच्याच संघाकडून टीम इंडियाचा घरच्या मैदानावर पराभव झाला होता. त्यावेळी ग्रॅम स्वान हा इंग्लंडच्या संघाचा भाग होता आणि त्याने चांगली गोलंदाजीही केली होती. या मालिकेनंतर टीम इंडिया घरच्या मैदानावर अजय असून गेल्या आठ वर्षात एकही संघ टीम इंडियाला मायदेशात पराभूत करू शकलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या