गावकारभाऱ्यांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद, किरकोळ प्रकार वगळता ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान

 

 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पश्चिम महाराष्ट्रात आज अत्यंत चुरशीने मतदान झाले. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत झाले. हिवरे बाजार आणि राळेगणसिद्धी येथे बिनविरोधची परंपरा खंडित झाल्याने तेथेही चुरशीने मतदान झाले. तर, नगर तालुक्यातील डोंगरगणमध्ये पोलीस निरीक्षकाने मुख्याध्यापकाला मारहाण केल्याने ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातल्याचा प्रकार घडला. पोलीस निरीक्षकाने दिलगिरी व्यक्त केल्याने मतदान सुरळीत झाले, तर पारनेर तालुक्यातील किन्ही गावात उमेदवाराने महिला मतदाराला धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. अक्कलकोट तालुक्यातील खैराट येथे मतदानाआधीच उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे येथील मतदानप्रक्रिया थांबविण्यात आली. दुसरीकडे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिह्यातही शांततेत मतदान पार पडले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच मतदान केंद्रांवर सॅनिटायझर, थर्मल गनची व्यवस्था करण्यात आली होती. तर, मतदारांना मास्कशिवाय मतदान केंद्रांत सोडण्यात येत नव्हते.

सोलापूर जिल्ह्यात दुपारपर्यंत 70 टक्के मतदान

सोलापूर जिह्यातील 590 ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाले. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी साडेतीनपर्यंत 590 ग्रामपंचायतींमधील 12 हजार 225 उमेदवार मतदारांना मतदानासाठी बाहेर काढत होते. दुपारी तीनपर्यंत 70 टक्के मतदान झाल्याची नोंद झाली होती. तर अक्कलकोट तालुक्यातील खैराट येथे एका उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली. तर उत्तर सोलापूर तालुक्यातील तळेहिप्परगा येथे मतदानावरून दोन गटांत हाणामारी झाल्याचे वृत्त आहे.

सोलापूर जिह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 200 गावे संवेदनशील असून, या गावात विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिह्यातील 67 ग्रामपंचायत यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रासमोर आरोग्य पथक नेमण्यात आले होते. अनेक गावांत किंक्रांत सण असूनही मतदार मतदानासाठी बाहेर पडले होते. विशेष करून महिला व तरुणांचा उत्साह अधिक होता. जवळपास 85 ते 90 टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव या आपल्या मूळगावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

माढा तालुक्यातील 82 पैकी 74 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 266 मतदान केंद्रांवर आज सर्वत्र शांततेत 84.97 टक्के मतदान पार झाल़े  613 सदस्यांसाठी 1394 उमेदवारांचे भविष्य आज मतदानयंत्रात बंद झाले आहे. काही मतदान केंद्रांवर साडेपाचनंतरही रांगा होत्या. तर उपळाई बु. येथील मतदान यंत्र बंद पडल्यानंतर ते बदलून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली.

अक्कलकोट तालुक्यातील 62  ग्रामपंचायतींकरिता  213 बूथवर शुक्रवारी दुपारी साडेतीनपर्यंत 67 .66 टक्के शांततेत मतदान झाले.

उत्तर सोलापूर तालुक्यातील तळेहिप्परगा ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी दुपारी मतदान करण्यावरून दोन गटांत वाद झाला. आम्हाला मतदान कर म्हणून एक गट मतदारांवर प्रभाव पाडत असल्याचे दिसल्याने दुसऱया गटाने अक्षेप घेतला. यात वाद वाढत गेल्याने हाणामारी व दमदाटी सुरू झाली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, घटनास्थळी येऊन पाहणी केली. या घटनेनंतर गावातील बंदोबस्त वाढविण्यात आला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व पोलीस निरीक्षक सुदाम जगताप यांनी भेट दिली.

मतदानाआधीच उमेदवाराचा मृत्यू

अक्कलकोट तालुक्यातील खैराट येथील ग्रामपंचायत निवडणुकीतील शेतकरी ग्रामविकास आघाडीचे उमेदवार सालबाळा घानप्पा बिराजदार यांचे पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान हृदयविकाराने निधन झाले. गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती बिघडल्याने सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मतदानाच्या दिवशी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यामुळे येथील मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या