ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून घरात घुसून जिवे मारण्याचा प्रयत्न; 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जानेवारी 2021 मध्ये झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीच्या वादाचे पर्यवसान मोठ्या भांडणात होऊन बोरगाव (ता.जळकोट) येथे एका शेतकऱ्याच्या घरात घुसून तलवार, कोयते व लोखंडी रॉडने हल्ला करीत जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, बोरगाव (ता.जळकोट) येथील फिर्यादी शिवाजी व्यंकटराव केंद्रे यांचे कुटुंबीय त्यांच्या घरी 29 जुलै रोजी रात्री 8.30 वाजता जेवण करत असताना आरोपी हणमंत गोविद केंद्रे, संजीव संभाजी केंद्रे, लक्ष्मण संभाजी केंद्रे, रामेश्वर सुभाष केंद्रे, चंद्रकांत हणमंत केंद्रे सर्व (रा.बोरगाव) व भिमा गंगाधर मुंढे रा. वडगाव (ता. जळकोट), संजय नंदलाल पुरी (रा.केकराबी, झारखंड) तसेच अन्य चार जण असे एकूण 11 जण यांनी घरात घुसून दार बंद करून शिवीगळ केली.

ग्राम पंचायत निवडणुकीतील जुनी कुरापत काढून मनात राग धरुन, कट रचून जिवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी शिवाजी केंद्रे यांची आई चंपाबाई व्यंकटराव केंद्रे (60) यांच्या डोक्यात लोखंडी रॉड, कोयत्याने मारुन गंभीर जखमी केले आहे. तसेच फिर्यादी व त्यांचे साथीदार यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन घरातील साहित्याची तोडफोड करीत 50 हजार रुपयांचे नुकसान केले आहे.

याप्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यात फिर्यादी शिवाजी केंद्रे यांच्या फिर्यादीवरुन उपरोक्त 7 व इतर 4 अशा 11 आरोपींविरुद्ध गु.र.नं.117/ 21 कलम 307, 147, 143, 148, 149, 452, 342, 504, 427 भादंवि तसेच सह कलम 4, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वयोवृद्ध जखमी महिलेवर उदगीर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

उप विभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले, पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ बोईनवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. बोरगाव येथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून सध्या गावात शांतता आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या