कर्जत, राहुरीत युवा नेतृत्वाचा विजय, कर्जतमध्ये आमदार रोहित पवारांचे वर्चस्व

कर्जत तालुक्यातील तालुक्यातील राक्षसवाडी खुर्द व निमगाव गांगर्डा या दोन ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. आज 54 ग्रामपंचायतींची मतमोजणी तहसील कार्यालयामध्ये झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे वर्चस्व कर्जत तालुक्यावर निर्माण झाल्याचे दिसून आले. भाजपनेही 28 ग्रामपंचायतींवर वर्चस्व असल्याचा दावा केला आहे. तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचे सदस्य निवडून आले आहेत.

राहुरीत 34 ग्रामपंचायतींवर प्राजक्त तनपुरे गटाची बाजी

राहुरी तालुक्यातील 44 पैकी 34 ग्रामपंचायतींवर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे गटाने बाजी मारली असून, 10 ग्रामपंचायतींत माजी आमदार शिवाजी कर्डिले गटाने वर्चस्व राखले आहे. आमदार राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या गटाच्या ताब्यात असलेल्या उंबरे तसेच ऍड. सुभाष पाटील यांच्या ताब्यात असलेल्या वांबोरी ग्रामपंचायतीत अनेक वर्षांनंतर प्रथमच सत्तांतर होऊन राज्यमंत्री तनपुरे गटाला बहुमत मिळाले आहे.

नगर तालुक्यात राजकीय उलथापालथ

ह नगर तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींची सावेडीतील पाऊलबुद्धे शाळेत मतमोजणी झाली. या निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ झालेली दिसली. डोंगरगण, मांडवे येथे सत्तांतर झाले. भोरवाडी येथे पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर यांच्या गटाला धक्का बसला. खंडाळा येथे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी सत्ता कायम राखली. मात्र, याठिकाणी त्यांचे बंधू प्रवीण कार्ले यांचा पराभव झाला. टाकळी काझी येथे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष संपत म्हस्के यांच्या चिरंजिवांचा पराभव झाला. इमामपूर येथे जिल्हा परिषद सदस्य गोविंद मोकाटे यांनी सत्ता राखली. मांडवे येथे पाचपुते गटाने बाजी मारली, तर सांडवा, मांजरसुंबा, खोसपुरी, पिंपरी, ससेवाडी, बाराबाभळी येथे कर्डिले गटाने यश मिळविले. धनगरवाडी, गुणवडी, इसळक, डोंगरगण येथे महाविकास आघाडीने, तर टाकळी काझी, खडकी, खंडाळा येथे

राहात्यात विखे गटाचे वर्चस्व

राहाता तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 6 ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. 19 ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणूक निकालात लोणी खुर्द व शिंगवे या दोन ग्रापंचायती वगळता 17 ग्रामपंचायतींवर विखे गटाने वर्चस्व राखले. यात अस्तगाव ग्रामपंचायत, नांदूर, रामपूरवाडी, एकुरखे, ममदापूर, जळगाव, आडगाव बु., गोगलगाव, पाथरे बु., रांजणगाव खु., केलवड, हसनापूर, चंद्रपूर, हणमंतगाव, बाभळेश्वर, पिंपळवाडी या ग्रामपंचायतींत विखे पाटील यांच्याच दोन गटांत लढत होऊन सत्ता कायम राखण्यात यश मिळाले. शिंगवे ग्रामपंचायतींत विखे गट व आमदार अशुतोष काळे गटाची युती असताना माजी आमदार स्नेहलता कोल्हे गटाने 8 जागा जिंकून ग्रामपंचायत ताब्यात घेत येथे सत्तांतर घडविले.

शेवगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये परिवर्तन

शेवगाव तालुक्यात पार पडलेल्या 48 ग्रामपंचायतीच्या निवडणुक निकालात अनेक गावात सत्तापरिवर्तन झाले असुन जवळपास 18 गावात युवकांच्या स्थानिक आघाडीने बाजी मारली आहे. तर काही गावात वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, दिव्यांग संघटना, कॉंग्रेस पक्षाच्या काही समर्थकांनी विजय मिळवला आहे. शिवसेनेने झेंडा फडकविला.

आपली प्रतिक्रिया द्या