परभणी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व

परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक प्रस्थापित नेतेमंडळींना धक्के देणारे निकाल लागले आहेत. काही दिग्गज नेत्यांनी आपले गड राखण्यात यश मिळवले असल्याचे दिसून येत आहे. परभणी जिल्ह्यातील 566 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 68 ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. त्यामुळे 498 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. अनेक ग्रामपंचायतींच्या निकालात प्रस्थापितांना धक्का बसल्याचे दिसून येत आहे.

झरी ग्रामपंचायतीत शिवसेनेचे वर्चस्व
परभणी तालुक्यातील सर्वात मोठ्या झरी या ग्रामपंचायतीत शिवसेनेचे नेते गजाननराव देशमुख व डॉ.प्रमोदराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलने 17 पैकी 10 जागा पटकावून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार व दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य पॅनलने 7 जागा पटकाविल्या आहेत.

जिंतूर तालुक्यातील बलसा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पंचायत समितीच्या सभापती वंदना गणेश इलग यांच्या पॅनलचा पराभव झाला असून उपसभापती शरद मस्के यांच्या पॅनलचाही जोगवाडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. पांगरी ग्रापंचायतीच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई बुधवंत यांना काठावर बहुमत मिळाले आहे. रेपा ग्रामपंचायतींच्या सात जागा जिंकून राष्ट्रवादीने एकहाती वर्चस्व मिळविले आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उज्वला राठोड यांना पिंपळगाव काजळे तांडा ग्रामपंचायतीत काठावरचे बहुमत मिळाले.

देवगाव फाटा ग्रामपंचायतीवर भगवा फडकला
सेलू तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या गेलेल्या आहेरबोरगाव व झोडगाव ग्रामपंचायतीवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकला असून दोन्ही ठिकाणी शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आहेरबोरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत दिगंबरराव लहाने यांच्या नेतृत्वाखाली 9 पैकी 5 जागेवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. झोडगाव ग्रामपंचायतीमध्ये 9 पैकी 6 उमेदवार विजयी झाले. देवगाव फाटा ग्रामपंचायत निवडणुकीत रामेश्वर बहिरट व बाबूअप्पा साळेगावकर यांच्या नेतृत्वाखाली जिजाबाई तुकाराम सोन्ने, राधा नागनाथ साळेगावकर, गुंफाबाई सखाराम चव्हाण व चंद्रकला रखमाजी सातपुते हे 4 उमेदवार विजयी झाले आहेत.

सेलू तालुक्यातील तांदळवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या पॅनलने 7पैकी 4 जागा जिंकून ग्रामपंचायतवर वर्चस्व मिळवले आहे. आहेर बोरगावमध्ये माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या पॅनलला बहुत मिळाले असून वालूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संजय साडेगावकर यांच्या पॅनलला यश मिळाले आहे.

चार ग्रामपंचायतींमध्ये लक फँक्टर
चार ग्रामपंचायतमधील उमेदवारांना समान मते मिळाल्यामूळे त्यांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली. त्यामध्ये नांदगाव, सोनवटी, धनेगाव व झोडगाव या गावाचा समावेश आहे. या ठिकाणी समसमान मते पडल्यामुळे तेथे चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली.या ग्रामपंचायतमध्ये लक फँक्टर महत्वाचा ठरला.

गंगाखेड तालुक्यात महाविकास आघाडीने यश संपादन केले आहे. मोठ्या गावांमध्ये महाविकास आघाडीचे पॅनल विजयी झाले आहे. गंगाखेड तालुक्यातील ईसाद, पडेगाव, धारासूर, मुळी, मरडसगाव, कौडगाव, हरंगूळ, सायळा, सुपा आदी प्रमुख ग्रामपंचायतींसह इतर अनेक गावांमध्ये महाविकास आघाडीच्या स्थानिक आघाड्यांनी विजय संपादन केला आहे.

पाथरी तालुक्यातील उमरामध्ये काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस-आणि शिवसेना अशी तिरंगी लढत झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेस 4, शिवसेना 3, काँग्रेस 2 जागा मिळाल्या. कोणत्याही गटाला बहुमत मिळाले नाही. हदगाव निवडणूकीत राष्ट्रवादीचे बाजार समिती सभापती अनिल नखाते यांच्या पॅनलला 11 पैकी 8 जागांवर विजय मिळाला. पाथरी शहरालगतच्या देवनांदरात 13 पैकी 11 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला. बाजार समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माधवराव जोगदंड यांच्या गटाला बाबूलतारमध्ये 9 पैकी 7 जागा मिळाल्या.

सोनपेठ तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत शेळगावमध्ये 15 पैकी 15 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला. विटा खु ग्रामपंचायत निवडणूकीत माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर गटाने 6 तर विरोधी गटाने 3 जागांवर विजय मिळविला. पालम तालुक्यातील आरखेड ग्रामपंचायतीत 9 पैकी 9 जागा शेकाप-राष्ट्रवादीने मिळविल्या. जिंतूर तालुक्यातील सर्वात मोठी चारठाणा ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंच इंद्रजित घाटुळ व जि.प. सदस्य नानासाहेब राऊत या दोघा प्रतिस्पर्धी पॅनलला प्रत्येकी 7 जागा मिळाल्या आहेत. उर्वरीत 3 जागापैकी शिवसेनेचे किरण देशमुख यांच्या पॅनलने एक जागा पटकाविली असून 2 जागा एम.डी. देशमुख व भारत खाडे यांनी पटकाविल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या