प्रसिद्ध गायक आणि ग्रॅमी अवॉर्ड विजेत्या कलाकाराचा कोरोनाने घेतला बळी

918

जगभरात कोरोनाचे थैमान सुरूच असून मृतांचा आकडा 70 हजार पार गेला आहे. इटली, स्पेन, फ्रांस आणि अमेरिकेत कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. कोरोनाने अनेक नामवंत लोकांनाही विळख्यात घेतले असून काहींचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे प्रसिद्ध गायक आणि ग्रॅमी अवॉर्ड विजते जॉन प्राइन  (John Prine) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत्यूसमयी ते 73 वर्षांचे होते.

जॉन प्राइन (John Prine) यांना न्यूमोनिया झाला होता. गेल्या काही दिवसांपासून ते खूप आजारी होते. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाली.
जॉन यांची पत्नी फियोना यांनी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती 20 मार्चला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दिली होती. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जॉन यांच्यावर वँडरबिल्ट युनिव्हरसिटी मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू होते. 13 दिवस आयसीयूमध्ये होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. जॉन यांच्या कुटुंबीयांनी सुद्धा या वृत्तास दुजोरा दिला आहे.

1991 व 2005 ला ग्रॅमी अवॉर्डने सन्मानित
10 ऑक्टोबर 1946 रोजी जॉन यांचा जन्म शिकागोमध्ये झाला होता आणि 14 वर्षांचे असल्यापासून त्यांनी गिटारचं प्रशिक्षण घेतले. त्यांनी शिक्षण देखील संगीतातूनच पूर्ण केले होते. ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच्या काळात त्यांनी गाणी लिहिण्यास सुरूवात केली. 1991 मध्ये त्यांनी बेस्ट कंटेंपररी फोक अल्बमसाठी ग्रॅमी अवॉर्ड मिळाला होता. याच कॅटेगरीमध्ये 2005 मध्ये सुद्धा त्यांना दुसरा ग्रॅमी अवार्ड मिळाला होता. 2019मध्ये त्यांना द रेकॉर्डिंग अकादमीचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता. ते गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरमुळे त्रस्त होते. त्यांच्या मानेची आणि फुप्फुसांची शस्त्रक्रिया देखील झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या