ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा परिषदेसमोर बोंबाबोंब आंदोलन

159

सामना प्रतिनिधी । नगर

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे पगार ऑनलाईन होण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या बोंबा व घोषणांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून निघाला. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष कॉ. सुभाष लांडे, जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, एकनाथ वखरे, संदिप आल्हाट, कॉ.संजय डमाळ, संतोष लहासे, धनराज गजरमल, सुनिल शिंदे, सुरेश कोकाटे, राजेंद्र कोरडे, कॉ.संजय शेलार, अस्लम सय्यद, इंद्रभान दगडू, उत्तम कटारे, सचिन कांबळे, चंद्रकांत उघडे, अंजना आढाव आदी सहभागी झाले होते.

गेल्या सहा ते आठ महिन्यापासून ग्रामविकास मंत्रालयाने आकृतीबंध कर्मचार्‍यांचे पगार ऑनलाईन करण्याचे घोषित केले. मात्र याबाबत ठोस कार्यवाही अद्यापि झालेली नाही. विविध परिपत्रक ग्रामविकास खात्याने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रा. पं. उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच तालुका गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना ऑनलाईनसाठी मार्गदर्शन देऊन पगार ऑनलाईन होण्यासाठी माहिती संकलित करण्याचे सांगितले आहे. मात्र नगर जिल्ह्यात ठोस कार्यवाही झालेली नाही. यामुळे सहा ते आठ महिन्यापासून ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे पगार झालेले नाही. तसेच ग्रामपंचायतीने देखील त्यांच्या अनुदानातून पगार केले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सदर ८० टक्के कर्मचारी गरीब व मागासवर्गीय आहेत. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पगारावरच चालत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे ऑनलाईन पगार होण्यासाठी आवश्यक माहिती संगणक प्रणालीमध्ये अद्यावत करण्याचे सांगितले असून, यामध्ये एप्रिल २०१८ पर्यंन्त साठ हजार कर्मचार्‍यांपैकी केवळ चोवीस हजार कर्मचार्‍यांनीच माहिती भरल्याचे संकेतस्थळावर दिसत आहे. यापुर्वी दि. १५ एप्रिल ही मुदत देण्यात आली होती. मात्रा आता ती दि. ११ मे पर्यंन्त वाढवून देण्यात आलेली आहे. या काळावधीत ही माहिती भरणे आवश्यक आहे. शासनाने दि. १ ऑक्टोंबर २०१७ ते ३१ मार्च २०१८ पर्यंन्त कर्मचार्‍यांचे अनुदान जमा केलेले आहे. सदर माहिती दि.२२ मे पर्यंन्त भरण्यासाठी कक्ष अधिकारी रा.अ. ताठरे यांनी आदेश काढले असून, ऑनलाईन माहिती भरण्याचे अभियान दि. २२ मे पर्यंन्त पूर्ण करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या