आजी सायकलने निघाली अमरनाथकडे

फोटो सौजन्य-EenaduIndiaMarathi

सामना प्रतिनिधी, नागपूर

बुलढाणा जिल्ह्यातील ७० वर्षीय सुपरआजी चक्क सायकलवरून खामगाव तालुक्यातून हिंदुस्थान भ्रमंतीला निघाली आहे. आतापर्यंत या आजीने माहूरगड तसेच वैष्णोदेवीपर्यंतचा तब्बल ४ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. आता या वर्षी वैष्णोदेवीच्या पुढे जाऊन अमरनाथची यात्रा सायकलने पूर्ण करणार आहे.

रेखा जोगळेकर असे या आजीचे नाव असून त्या माजी शिक्षिका आहेत. संसाराची धुरा सांभाळत जिल्हा परिषदेत तब्बल ३० वर्षे केंद्रप्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यामुळे संसाराचा गाढा यशस्वीरीत्या ओढून झाल्यानंतर आपल्या निवृत्तीनंतर काहीतरी अनोखे करण्याची जिद्द घेऊन या आजी गेल्या तीन वर्षांपासून हा त्यांचा हिंदुस्थान भ्रमंतीचा प्रवास सुरू केला आहे. या वयात काहीतरी हटके करून दाखवण्याची प्रेरणा आजीबाईंना त्यांच्या आईकडून मिळाली असल्याचे आजीबाई सांगतात.

अगदी ७० व्या वर्षी ठणठणीत दिसणाऱ्या आजीचा आदर्श प्रत्येक नवयुवतींनी घ्यावा असे या आजीला वाटते. आजच्या या स्पर्धेच्या युगात महिलाही कुठे कमी नाहीत हाच संदेश घेऊन आजीबाईंनी हा हिंदुस्थान भ्रमंतीचा निर्धार ७० व्या वर्षी केला आहे. नाथ प्लॉट खामगाव येथील रहिवासी असलेले योगेश जोगळेकर हे आजीचे एकमेव चिरंजीव आहेत. ते सध्या यवतमाळ येथील राज्य वीज मंडळात ठेकेदारी करतात. आजी २१ जून रोजी बुलढाणाहून निघाल्या साधारणत: त्या २२ जुलैला अमरनाथ पोहचणार आहेत. अगदी पावसाळ्याच्या सुरुवातीला हा हिंदुस्थान भ्रमंतीचा प्रवास सुरू होऊन पुढे अनेक राज्य पार करत आजी दररोज शरीर साथ देईल तितका प्रवास करतात. रात्री एखादी मोक्याची जागा पाहून विश्रांती घेतात. आजी केवळ परिधान करावयाचे कपडे आणि काही ऊन-पावसापासून सुरक्षेचे साहित्य घेऊन हिंदुस्थान भ्रमंतीला निघाल्या आहेत. वाटेत मिळेल तिथे मिळेल ते खाऊन आजी आपला हा प्रवास करणार आहेत.