आजोबाने नातीला गर्भवती केले, बळजबरीने करवला गर्भपात

तमिळनाडूमध्ये 71 वर्षांच्या वृद्धाला पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या 15 वर्षांच्या नातीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गंभीर बाब ही आहे की या बलात्कारामुळे ही मुलगी गर्भवती राहिली होती. आपलं बिंग फुटू नये म्हणून आजोबाने तिला जबरदस्ती गर्भपात करायला लावला. तमिळनाडूमधल्या कल्लकुरुची जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 2 महिलांनाही अटक केली आहे. या दोघींनी आरोपीला गर्भपातासाठी मदत केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

पीडित मुलीच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर पिडितेच्या वडिलांनी दुसऱ्या महिलेसोबत लग्न केलं होतं. यामुळे पीडित मुलगी आणि तिचा भाऊ हे आजोबांसोबत राहात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटलंय की गेली 3 वर्ष या मुलीवर तिचा आजोबा बलात्कार करत होता. आपली नात गर्भवती असल्याचं कळाल्यानंतर तिच्या आजोबाने त्यांच्याच भागात राहणाऱ्या एका महिलेची आणि निवृत्त परिचारिकेची मदत घेतली. या दोघींच्या मदतीने त्याने नातीचा गर्भपात करवला.

या सगळ्या प्रकाराची गावकऱ्यांना कुणकुण लागताच त्यांनी हा प्रकार एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कानावर घातला. त्याने ताबडतोब पोलिसांत तक्रार नोंदवली ज्यानंतर आजोबा आणि त्याला मदत करणाऱ्या दोन महिलांविरूद्ध कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आला असून पोलिसांनी आजोबाविरोधात पोक्सो आणि इतर कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आजोबा आणि दोन महिलांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या