रेल्वे आणि फलाटामध्ये अडकलेल्या रुद्रला आजोबांमुळे जीवदान

45

सामना ऑनलाईन,संभाजीनगर

नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमधून उतरल्यानंतर तीन वर्षांच्या रुद्र या बालकास प्रवाशाचा धक्का लागल्यामुळे तो प्लॅटफॉर्म आणि रेल्वेगाडीमध्ये असलेल्या जागेतून  खाली पडला. क्षणाचाही विलंब न करता त्याच्या आजोबांनी प्लॅटफॉर्मवर झोपून त्याला रेल्वेपटरीवरून काढले. रुद्रच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाल्यामुळे तो रडत होता. मात्र, त्याच्यावर आलेले मोठे संकट टळल्यामुळे आजोबा आणि त्याच्या आईच्या डोळ्यातून आनंदआश्रू वाहत होते.

शेषराव गोंधळे हे परभणी येथून तपोवन एक्स्प्रेसमध्ये बसले. दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास तपोवन एक्स्प्रेस संभाजीनगर रेल्वेस्थानकात दाखल झाल्यावर गोंधळे हे मुलगी संगीता, तिच्याकडे असलेले तीन महिन्याचे बाळ, नातू रुद्र आणि सोबत असलेल्या पिशव्या उतरविण्यासाठी अगोदरच दरवाजाजवळ येऊन थांबले. संभाजीनगर रेल्वेस्थानक आल्यावर त्यांनी रुद्रला प्लॅटफॉर्मवर उतरवले आणि लहान बाळ, बॅग घेण्यासाठी पुढे सरकले असता अन्य प्रवाशाच्या धक्क्याने रुद्र प्लॅटफॉर्म आणि रेल्वेगाडीच्या मोकळ्या जागेतून खाली पडला. मुलगा खाली पडल्याचे गाडीत बसलेल्या महिलेने पाहिले आणि ती जोरात ओरडली. दरम्यान, गाडी निघण्याची वेळ झाल्यामुळे काहीजण रेल्वेची चेन ओढण्यासाठी आत शिरू लागले, तर काही धावपळ करू लागले. मात्र, रुद्रचे आजोबा पटकन खाली प्लॅटफॉर्मवर झोपले आणि दोन-तीन वेळा प्रयत्न करून रुद्रला रेल्वेपटरीवरून बाहेर काढले. या अपघातात रुद्रच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. नातू सुखरूप असल्याचं बघितल्यानंतर गोंधळेंच्या जीवात जीव आला. आजोबांनी केलेल्या धाडसाचे रेल्वेस्टेशनवर कौतुक होत होते.

आपली प्रतिक्रिया द्या