आजी सांगते रेसिपी, नातू करतो यूटय़ूबवर अपलोड; ‘आपली आजी’ चॅनेलला 6.5 लाख सबस्क्रायबर

नमस्कार बाळांनो, असं म्हणत व्हिडिओंच्या माध्यमातून रेसिपी शिकवणाऱया आजी-नातवाची जोडी एकदम भारी आहे. नगरच्या सारोळा कासार गावातील सुमन धामणे आणि त्यांचा नातू यश पाठक यांनी गेल्या वर्षी ’आपली आजी’ हे युटय़ूब चॅनेल सुरू केले. या चॅनेलवरून सुमन आजी लाखो लोकांना मराठी रेसिपी शिकवतात. अल्पावधीत आजी घरोघरी, गावोगावी पोहोचल्या आहेत.

सुमन आजी शिकलेल्या नाहीत, पण त्यांना स्वयंपाकाची लहानपणापासून आवड होती. त्यांनी त्यांच्या सासूबाईंकडूनही स्वयंपाकाचे धडे घेतले. स्वयंपाकासाठी त्यांच्या स्वत:च्या काही टिप्स असतात. आजीमधील लपलेलं टॅलेंट सर्वांसमोर आणण्याचे नातू यश याने ठरवले. तो आजीच्या रेसिपींचे मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करतो आणि युटय़ूबवर व्हिडिओ अपलोड करणे.

‘आपली आजी’ चॅनेलचे पहिल्या तीन महिन्यांत एक लाखाहून जास्त सबस्क्रायबर झाले. सध्या सबस्क्रायबरची एकूण संख्या 6.5 लाख झाली आहे. त्यातून महिन्याला दीड ते दोन लाख रुपयांची कमाई होते.

आजी म्हणते कुटुंब झाले मोठे

महाराष्ट्राची खाद्यसंस्पृती घरोघरी पोहोचवण्याचे काम सुमन आजी करतात. त्या घरोघरी पोचल्या आहेत. अनेक लोक त्यांना ओळखू लागले आहेत. मुली त्यांच्यासोबत फोटो काढतात. ते बघून माझं कुटुंब आता मोठं झालंय, असं आजी म्हणतात.

इंग्रजी शब्द शिकल्या

सुमन आजी शिकलेल्या नाहीत. त्यामुळे पदार्थांची इंग्रजी नावे त्यांना उच्चारता येत नव्हती. सॉस, बेकिंग पावडर, कॅचअप, मिक्स्चर असे अनेक शब्द आजींना नातवाने शिकवले. आणि आजीने एका आठवडय़ात ते शिकून घेतले, असे नातू यश सांगतो.

16 ऑक्टोबरला हॅक झाले चॅनेल

’आपली आजी’ युटय़ूब चॅनेल 16 ऑक्टोबर रोजी हॅक झाले. त्यामुळे आजी- नातवाला मोठा धक्का बसला होता. आजींना तर एवढे वाईट वाटले की त्या एक दिवस जेवल्या नाहीत. यशने युटय़ूबला ईमेल्सच्या माध्यमातून हॅकिंगची माहिती दिली. त्यानंतर चार दिवसांत चॅनेल पुन्हा सुरू झाले.

आपली प्रतिक्रिया द्या